नवी मुंबई : बातमीदार
कोरोनामुळे जरी नागरिक घरी असले तरी महिनाभर घरी राहिल्याने नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे अनेकजण घरातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून मात्र त्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्यात येत आहे. मात्र असे असले तरी पोलिसांचे टेन्शन काही कमी झालेले नाही. नागरिक रस्त्यावर नाहीतर इमारतींवरील गच्चीवर गर्दी करू लागले आहेत. अखेर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनद्वारे नवी मुंबईवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सध्या संपूर्ण नवी मुंबईत दोन ते तीन ड्रोन कॅमेर्यांचा वापर करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. त्यासोबत सध्या नागरिकांनी आपल्या घराबाहेर गर्दी करत आहेत. नागरिकांनी घरात थांबावे म्हणून पोलिसांना कसरत करावी लागत आहे. हे कमी की काय नागरिकांकडून आता इमारतींच्या गच्चीवर गर्दी करण्यात येत आहे. विविध खेळ खेळण्यासाठी नागरिक इमारतींवर एकत्र येऊ लागलेत. अशा बेशिस्त नागरिकांसाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासोबत मुस्लीमबहुल ठिकाणी रमजानच्या महिन्यात नजर ठेवण्यात येणार आहे. रमजानच्या काळात लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रकारची तयारी केली आहे. मुस्लीम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळावेत. कोणत्याही मशिदीमध्ये, इमारतीच्या टेरेसवर जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यानुसार नवी मुंबईत नियमांचा भंग होऊ नये म्हणून ड्रोनच्याद्वारे नजर ठेवली जात आहे. नियम मोडणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मशिदींमधून अजानची घोषणा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नमाज पठण करण्यासाठी मशिदीमध्ये जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रमजानच्या पवित्र महिना घरी राहून साजरा करावा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.
पोलिसांवर ताण आहे. त्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे. बेशिस्त नागरिकांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता पोलिसांना सहकार्य करावे. तसेच मुस्लिम बांधवांकडून देखील सहकार्य मिळत आहे.
-पंकज डहाणे, डीसीपी, नवी मुंबई पोलीस, परिमंडळ एक