Breaking News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचे वर्चस्व; आता बांधणी कोकणातील आगामी निवडणुकांसाठी -राणे

कणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणीनंतर निकाल समोर आले. सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघामध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या सुरेश दळवी यांचा पराभव केला आहे. तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली पराभूत झाले असून महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी झाले. दरम्यान, भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलला 11, तर महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला आठ जागांवर विजय मिळाला आहे. या वेळी कणकवलीमधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली होती. समसमान मते पडल्यानंतर चिठ्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष होते. तर औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघातून भाजपचे गजानन गावडे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या लक्ष्मण आंगणे यांचा पराभव केला. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभूत करत भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने 11 जागा जिंकत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण 14 विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात होते. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत झाली.

भाजपची सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत नितेश राणे, निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यामुळे हा विजय मिळाला. आता

यापुढे तिन्ही जिल्ह्यांतून विधानसभा आणि लोकसभेत भाजपचेच प्रतिनिधी जातील.

-नारायण राणे, केंद्रीय मंत्री

सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी हे सगळे झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.

-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

सत्तेच्या जोरावर सुरू असलेले राजकारण, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने चालवलेल्या कारवायांना ही एक सणसणीत चपराक आहे.

-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply