पनवेल : रामप्रहर वृत्त
’जागर नवदुर्गेचा सन्मान नारिशक्तीचा’ या कार्यक्रमात आपले कर्तव्य समजून दरवर्षी दिशा व्यासपीठ सुचवेल अशा एका गरजू महिलेची प्रसूती यशोदा हॉस्पिटल आणि आयव्हीएफ सेंटर, कामोठे येथे मोफत केली जाईल असे जाहीर केले होते. त्यानुसार गरजू व गरोदर महिलेची नोंदणीकरून यशोदा हॉस्पिटलमध्ये या महिलेची मोफत प्रसुती करण्यात आली. घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने प्रसुतीचा खर्च झेपणारा नव्हता. अशा वेळेस सुप्रिया या गरजू महिलेची यशोदा हॉस्पिटलमध्ये नोंदणी करण्यात आली. अचानक सुप्रियाच्या पोटात दुखायला लागल्यामुळे यशोदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. नॉर्मल प्रसूती करणे शक्य कसल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. सुप्रियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळंतीण व सोन्याच्या पावलांनी आलेली ही लक्ष्मी अगदी ठणठणीत व सुखरूप आहे. सुप्रियासह तिच्या कुटुंबियांनी दिशा व्यासपीठासह हॉस्पिटलमधील स्टाफ, डॉ. बाळासाहेब खडबडे, डॉ. स्नेहलता यांचे आभार मानले.