Breaking News

राज्यपाल साहेब, महाराष्ट्र वाचवा!

भाजपच्या शिष्टमंडळाचे साकडे; राष्ट्रपतींकडे माहिती पाठविण्याची मागणी

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारच्या घटना बाहेर येतायेत त्या चिंताजनक आहेत. पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्याऐवजी पक्षाच्या वसुलीसाठी त्यांना वापरले जात आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 24) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. यानंतर फडणवीस यांनी पत्रकार
परिषद घेऊन भेटीबाबतची सविस्तर माहिती दिली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. या शिष्टमंडळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आदी प्रमुख नेत्यांचा समावेश होता. राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा आपण घेऊन त्याची माहिती राष्ट्रपतीकडे पाठवावी, अशी मागणी या नेत्यांनी या वेळी राज्यपालांकडे केली.
राज्य सरकारमध्ये नैतिकता उरली नाही. इतक्या मोठ्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन चिंताजनक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोनदा पत्रकार परिषद घेतली, पण त्यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचे काम केले, तर राज्यातील काँग्रेस ही अस्तित्वहीन आहे. त्यांची काहीही भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि इथे वेगळे बोलतात, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात अधिकार्‍यांमध्ये आतंक आहे. त्यांना बदलीची आणि कारवाईची भीती दाखविली जात आहे. भ्रष्टाचार, बदल्यांचे रॅकेट आहे अशी या ठाकरे सरकारची 100 प्रकरणे राज्यपालांना दिली आहेत. जे गोपनीय अहवाल सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री गप्प का?
मुंबई पोलीस दलात आयुक्त राहिलेल्या परमवीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले, पण पाच दिवसानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना गृहमंत्र्यांची चौकशी करतायत, ना परमवीर सिंहांची. रश्मी शुक्ला यांच्या गुप्त अहवालाचा आधार घेत भाजपने बदलीचे रॅकेट असल्याचा दावा केला, पण याही प्रकरणात मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमके काय सुरू आहे? हा प्रश्न पडतो. या सर्व प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री स्वतःहून गप्प आहेत
की त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे, असाही सवाल फडणवीस यांनी या वेळी केला.
अहवाल लवंगी फटाका की बॉम्ब ते लवकरच कळेल!
राज्यपालांना वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. वसुली, बदल्यांचे रॅकेट या घटना धक्कादायक आहेत. महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? सरकार काय करतेय? मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते केले पाहिजे, याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे. त्यांना तो अधिकार आहे. याबाबतचे निवेदन आम्ही दिले असल्याचे फडणवीस म्हणाले. अहवाल लवंगी फटाका की बॉम्ब ते लवकरच कळेल, असा इशाराही त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता दिला.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply