नवी मुंबई : बातमीदार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) नवी मुंबई जिल्ह्यातील सानपाडा शाखेतर्फे, ‘चला व्यसनाला बदनाम करू’ अभियान नववर्षाच्या पूर्वसंधेला म्हणजे 31 डिसेंबरच्या सायंकाळी राबविण्यात आले. सानपाडा कै. सिताराम मास्तर उद्यान येथे राबविण्यात आलेल्या या अभियानात सरत्या वर्षाला मद्याच्या पाटर्या करून निरोप द्यायच्या समाजाच्या मानसिकतेला छेद देत दुधाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. ‘द’ दारूचा नाही तर ‘द’ दुधाचा, असा संदेश देण्यात आला. शितल आहेर यांनी मोफत दुधाचे वाटप करताना तरुणांशी मद्यपान केल्याने होणार्या दुष्परिणामांची चर्चा केली. मद्यपान करणार्या व्यक्तीची जबाबदारी नकळत कुटुंबातील महिला सदस्यांवर येते. म्हणून महिलांनी मद्यपानाला कडाडून विरोध केला पाहिजे. मद्य प्यायला हिंमत लागत नाही तर मद्य प्यायला नकार द्यायला हिंमत लागते. तरुणांपुढे पथदर्शक म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात ‘नो व्हिस्की नो बियर हॅपी न्यू ईयर’ अशा घोषणा देण्यात आल्या. तरुणांनी दुधाचा आस्वाद घेत कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला साबाजी चौकेकर, अशोक निकम यांनी सहभाग नोंदवला.