Breaking News

महड ‘गुरचरण’ला अतिक्रमणाचा विळखा

प्रशासनाचे दुर्लक्ष; तक्रारी करूनही कारवाई नाही, स्थानिकांना आरोप

खोपोली : प्रतिनिधी

अष्टविनायकापैकी एक असलेले तीर्थक्षेत्र महड हद्दीतील गुरचरण जागेत झालेले अतिक्रमण त्यामुळे भविष्यात महडच्या विकासाला बाधा येणार आहे. अनेकदा तक्रारी उपोषण करूनसुद्धा ठोस कारवाई झालेली नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड गावातील गुरचरण जागेची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली असून, विशेष म्हणजे खरेदी खत होत नसताना, केवळ हमीपत्रावर लाखोंचे व्यवहार झाले आहेत. खालापूर नगरपंचायत हद्दीत महड गाव येत असून अष्टविनायापैकी एक वरदविनायकाचे मंदिर ह्या ठिकाणी आहे. जवळपास शंभर एकरच्या वर गुरचरण जागा आहे. महड साजगाव रस्त्यावर असलेल्या गुरचरण जागेत बेकायदेशीरपणे चाळी, फार्महाऊस व बंगले बांधण्यात आले आहेत. महडमध्ये गुरचरण विक्री करणारी दलालांची टोळीने गुरचरण जागा विकण्याचा सपाटाच लावला होता. पन्नास हजार ते साडेतीन लाखापर्यंत गुंठ्याला भाव घेऊन सरकारी व बिनसरकारी गुरचरण जागेची विक्री होत असून, महड गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात जागा खरेदी करून बंगले तसेच चाळी बांधल्या आहेत.

नगरपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी आवश्यक त्या परवानगी दलाल मिळवून द्यायचे. पाणी, वीजसारख्या सुविधा मिळत असल्यामुळे अनेकांनी जागा खरेदी केली आहे. जवळपास सव्वातीनशे बेकादेशीर घरे महड गुरचरण जागेतउभी राहिली असून या लाख ते दिड लाख रुपये गुंठा या दराने स्वस्त किमतीत जागा मिळतात. त्यामुळे असल्याने बाहेरिल व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केल्या आहेत. वीज मीटरसह, पाणी, रस्ते अशा विविध सुविधा दलाली घेऊन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्थानिकांना वीज मीटरसाठी चकरा मारूनसुद्धा अनेकदा कामे होत नाहीत. अशा परिस्थितीत बाहेरील व्यक्तीला सहज सोयी सुविधा उपलब्ध करून देणार्‍या प्रशासनाचीदेखील मिलिभगत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. जागा विक्री करताना कोणतीही शहानिशा केली जात नसून परप्रांतातील व्यक्तींनादेखील जागा विक्री करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी बांगलादेशी महिलेला गुरचरणात जागा विक्री करण्यात आले होते. त्यावेळी जागरुक नागरिकांनी विरोध केल्यामुळे धागा खरेदी रद्द झाली होती. दरम्यान, ही गुरचरण जागा महसूल विभागाच्या अंतर्गत येत असल्याने यासंदर्भात प्रस्तूत प्रतिनिधीने खालापूरचे तहसीलदार आयूब तांबोळी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बाहेरील विघातक प्रवृत्तींना आमंत्रण

बाहेरील विघातक प्रवृत्तींना एकप्रकारे आमंत्रण देवून देवस्थानाच्या सुरक्षेला धक्का लावण्याचे प्रकार सुरू असून 2018मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी दखल घेतली असून लवकरच बैठक घेऊ असे सांगितले होते, परंतू पुढे काहीच कारवाई झाली नाही. महडमधील बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या बांधकामांना देण्यात आलेल्या असेसमेंट उतार्‍यावर नगरपंचायतीकडून अनधिकृत असा शिक्का मारला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply