पनवेल ः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सोमवारी (दि. 2) देशभरात प्रारंभ झाला. पनवेल महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागांत असेलल्या 10 शाळांमध्येदेखील लसीकरणास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत 4500 मुलांचे लसीकरण झाले.
पनवेल मनपा क्षेत्रातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन के. व्ही. कन्या प्रशाला येथे करण्यात आले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शिक्षण विभागाचे बाबासाहेब चिमणे, वैद्यकीय अधिकारी रेहाना मुजावर, शाळेचे पदाधिकारी, शिक्षक, परिचारिका उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी पनवेल महापालिका सज्ज झाली असून शिक्षण विभागाच्या मदतीने 230 शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1,2,3,4,5,6 अंतर्गत प्रत्येक शाळांचे दिनांक आणि वारनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार त्या त्या शाळांमध्ये लसीकरण होणार आहे. दररोज 10 शाळांमध्ये लसीकरणासाठी 10 पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका असणार आहेत. रोज पाच हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष पालिकेने ठेवले असून सर्व शाळांचे येत्या आठ-दहा दिवसांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन केले आहे
महापालिकेच्यावतीने 15-18 वयोगटातील रोज होणारे लसीकरणाचे सेशन ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने समाजमाध्यमावर प्रसिद्ध होणार्या प्रेसनोटमध्येही रोजच्या लसीकरणाची माहिती देण्यात येणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत सुमारे 40 हजार मुले आहेत. त्यांच्या पालकांनी प्रसिद्ध केलेल्या आठवड्याच्या नियोजनातील शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना लस देण्यासाठी शाळेला परवानगी द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …