सुदैवाने एकाचाही मृत्यू नाही
अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारावर पोहचली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत दुपटीने रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. रुग्ण वाढत असले तरी अद्याप एकाचाही मृत्यू झालेला नाही ही समाधानाची बाब आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील उपाचाराधीन रुग्णांचे प्रमाण 170पर्यंत कमी झाले होते. दररोज सरासरी 30 ते 40 रुग्ण आढळून येत होते, पण मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली. रायगड जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी 99 रुग्ण आढळले, 31 डिसेंबरला 180, 1 जानेवारीला 196, तर 2 जानेवारीला 284 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यावरून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात दररोज 275 नवे कोरोना रुग्णांची नोंद होत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. तेथील रुग्णाची संख्या 629वर पोहचली आहे. पनवेल ग्रामीण हद्दीत 132, तर अलिबाग 64, पेण 47, खालापूर 28, उरण 26, कर्जत 25, रोहा 18, माणगाव 14, महाड 9, म्हसळा व पोलादपूर प्रत्येकी तीन, मुरूड व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि तळा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. सुधागड तालुका सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही.
जिल्ह्यात गेल्या पावणे दोन वर्षांत एकूण एक लाख 73 हजार 308 कोरोनाबाधित आढळून आले. यातील एक लाख 67 हजार 947 रुग्ण उपचारानंतर बरे झाले, तर चार हजार 588 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के, तर मृत्यूदर तीन टक्के आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्याचा मृत्यूदर अधिक आहे.
ओमायक्रॉनचाही शिरकाव जिल्ह्यात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व जण पनवेल महापालिका हद्दीतील आहेत. यातील तीन रुग्णांची परदेश दौर्याची पार्श्वभूमी आहे, तर दोघे हे परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत. ओमायक्रॉनची प्रसार क्षमता पूर्वीच्या विषाणूंपेक्षा अधिक असल्याने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.