पनवेल : रामप्रहर वृत्त
संघाच्या शाखेत चालणारे व्यायाम, खेळ, कवायती व बौद्धिकांमधून राष्ट्रभक्त व्यक्ती निर्माणाचे कार्य होत असल्याचे गौरवोद्गार डॉ. समिधा गांधी यांनी काढले.
पनवेल शहरातील नंदनवन प्रभात शाखेचा पहिला वार्षिक उत्सव रविवारी (दि. 8) झाला. वार्षिक उत्सवाच्या दिवशी जागतिक महिला दिन होता. त्या दिनाचे औचित्य साधून सदर उत्सवाकरिता पनवेलमधील प्रतिथयश दंत चिकित्सक डॉ. समिधा गांधी प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या वेळी प्रमुख वक्ते म्हणून संघाचे कोकण प्रांत सहसेवा प्रमुख शिरीष देशमुख, शहर कार्यवाह तेजस वाडकर यांच्यासह स्वयंसेवक, हितचिंतक, व परिसरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाखेमध्ये दररोज होणारे द्रुतयोग व्यायाम, खेळ, दंडसराव, सूर्यनमस्कार व पद्यासह संचलन सरावाचे प्रात्यक्षिके सादर झाली. डॉ. समिधा गांधी यांनी पुढे बोलताना, संघामध्ये असलेली शिस्त, एखाद्या प्रवासी कार्यकर्त्याची व्यवस्था स्वयंसेवकांच्या घरातच करणे तसेच समाजामध्ये निर्माण होणार्या आपात्कालीन परिस्थितीत त्वरित मदतकार्य करणे हे संघाचे वैशिष्ट्ये मला खूप भावले असे सांगून पनवेल कोळीवाड्यामध्ये ज्या पद्धतीने अभ्यासिका चालवली जाते, अशाचप्रकारचे सेवा प्रकल्प संघाच्या माध्यमातून पनवेल परिसरात अधिकाधिक ठिकाणी व्हावेत, अशी अपेक्षाही डॉ. गांधी यांनी व्यक्त केली.
नागूपर मधील एका शाखेतून झालेली संघाची सुरुवात आणि आज जगभरात हजारो शाखांमधून सुरु असलेले कार्य या विस्ताराबाबत सांगताना शिरीष देशमुख म्हणाले कि, यापूर्वी हाल अपेष्टा सहन करत समर्पित वृत्तीने ज्यांनी संघ घडवला, त्यांच्यामुळेच हे स्वरूप प्राप्त झाले आहे. आता संघ शाखेपुरता मर्यादित राहिला नाही तर लाखो सेवा कार्यातून तो समाजात रुजला आहे आणि त्यामध्ये महिलांचा सहभागही मोठा असल्याचे प्रतिपादन शिरीष देशमुख यांनी या वेळी केले.