पुण्यामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे ः प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असणार्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंवर बुधवारी (दि. 5) पुण्यातील नवी पेठ परिसरातील ठोसर पागामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणार्या सिंधुताई सपकाळ यांचे महिनाभरापूर्वी हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मंगळवारी 8च्या सुमारास पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी राज्यमंत्री विश्वजित कदम, भाजप नेत्या चित्रा वाघ, आमदार संजय जगताप, माजी आमदार उल्हास पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.
सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक व दुःखद असल्याचे सांगत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सिंधुताईंना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली. ‘डॉ. सिंधुताई सपकाळ या कायमच त्यांनी समाजासाठी केलेल्या चांगल्या कामासाठी लक्षात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक मुलांना चांगले जीवन जगता आले. त्यांनी उपेक्षित वर्गातील समाजासाठीही बरेच काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे फार दुःख झाले आहे. माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आणि हितचिंतकांसोबत आहेत. ओम शांती,’ असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.