Breaking News

मच्छीमारांना मदत करण्याचे मच्छीमार कृती समितीचे आवाहन; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना दिले निवेदन

मुरूड : प्रतिनिधी
नैसर्गिक संकटे व औद्योगिक कारखान्याच्या प्रदूषणामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व मच्छीमार मेताकुटीस आले असून केंद्र व राज्य सरकारकडून संकटात सापडलेल्या कोळी समाजास मदतीचा हात द्या, अशी विनंती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे. मंगळवारी (दि. 17) अलिबाग येथील तुषार शासकीय विश्रामगृह येथे कृती समितीचे चिटणीस उल्हास वाटकरे, रायगड जिल्हा मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले, उपाध्यक्ष जनार्दन भगत, कार्याध्यक्ष बी. एन. कोळी, सरचिटणीस संतोष पाटील, विजय तांडेल, सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकु, कोळी समाजाचे नगरसेवक पांडुरंग आरेकर आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. या वेळी आरसीएफ खताच्या कारखान्यामुळे थळ नवगावखाडीत व समुद्रात सांडपाण्यामुळे प्रदूषण होत आहे. सांडपाण्याचे पाईप खोल समुद्रात टाकल्याने बोटींचा अपघात होऊन सुमारे पाच कोटी रुपये नुकसान झाले आहे. आरसीएफ कंपनी दुर्लक्ष करीत आहे. तरी तातडीने ही नुकसानभरपाई मच्छीमारांना मिळावी इत्यादी मागण्या कृती समितीने निवेदनात केल्या आहेत. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून मच्छीमारांचे विविध प्रश्न सुटावेत यासाठी कोळी समाजाचे नेते व आमदार रमेश पाटील व चेतन पाटील यांनी सर्व मच्छीमारांना एकत्र करून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घडवून आण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सन 2018 व 2019 या वर्षात फ्यान, क्यार, महाचक्री वादळ, निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते चक्री वादळ या सर्व चक्री वादळांचा सर्वात मोठा फटका समुद्र किनारी असणार्‍या मच्छीमारांना बसल्याने करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सन 2017 पासून ते 2021 पर्यंत मच्छीमार सोसायट्यांचा डिझेल परतावा मिळालेला नाही.सदरचा परतावा तातडीने निर्गमित करण्यात यावा. राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) या संस्थेकडून मच्छीमारांना नौका उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध होत असते, परंतु मागील आठ वर्षांपासून सदरचे प्रस्ताव बंद करण्यात आले असून मच्छीमारांची कोंडी झाली आहे. तरी सदरील योजना पुन्हा सुरू करण्यात यावी. केंद्र शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मच्छीमारांना सुद्धा मिळावा, मच्छीमारांवर असलेले कर्ज माफ करण्यात यावे व मासळीचा दुष्काळ जाहीर करण्यात यावा. या अन्य मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत ते मी प्रामाणिकपणे सोडवणार आहे. यासाठी गरज लागल्यास पंतप्रधान मोदी साहेबांकडेसुद्धा तुमचे प्रश्न नेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. रायगडसह कोकणातील मच्छीमारांना न्याय मिळवून देणे हे केंद्र सरकार म्हणून आमचे काम असणार आहे. लवकरच केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
-कपिल पाटील, केंद्रीय मंत्री

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply