कळंबोळीत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधी
लायन्स क्लबचे सामाजिक काम मोठे आहे, लायन्सची ही परोपकाराची भावना समाजात झिरपत गेली पाहिजे, अशी अपेक्षा सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
कळंबोळी गार्डन येथे लायन्स क्लब न्यू पनवेल स्टील टाऊन संचलित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन आज रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, लायन्स क्लबचे अध्यक्ष मोहन गोरुर, सचिव वाय. पी. सिंग, ज्येष्ठ नागरिक संघ कळंबोळीचे अध्यक्ष सोपान भंडारे, नितीन काळे, महानगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका विद्या गायकवाड यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, लायन्स पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, ऑक्टोबर 2016 मध्ये पनवेल महानगर पालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडको वसाहतीतील सुस्थितीत असलेल्या सुविधा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सिडकोचे अधिकारी यासाठी सकारात्मक आहेत. या सुविधा
हस्तांतरीत झाल्यानंतर त्या महानगरपालिका सक्षमपणे हातळेल, असेही ते म्हणाले. आरोग्य सुविधेनंतर सार्वजनिवक सुविधा, भूखंड, रस्ते, गटारे व शेवटी पाणी पुरवठा या सुविधा हस्तांतरीत होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा केला नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. जवळपास साडेपाचशे कोटी रुपयांची मदत या निधीतून केली गेली. अनेक रुग्णांना यामुळे जीवनदान मिळाले, यापेक्षा पुण्याचे काम नाही, असे त्यांनी सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमल व अन्य मान्यवरांनी लायन्सच्या कामाचे व विरंगुळा केंद्राच्या उपक्रमाचे कौतुक केले.