सत्तेवाचून तडफडणार्या काँग्रेसची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे झाली आहे. तर याच सत्तेपायी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची अवस्था उतावीळ झालेली स्पष्ट दिसते आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील कथित गोंधळाची जबाबदारी झटकण्यासाठी तेथील काँग्रेस सरकार जे काही प्रयत्न करीत आहे, त्यास केविलवाणे हे एकमेव विशेषण उचित ठरावे. सत्ता हातात आल्यानंतर कसे वागू नये याची जणू उदाहरणेच पंजाबातील काँग्रेस सरकार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार घालून देत आहे. सत्तासुंदरीसारखी महामाया जगात शोधून सापडणार नाही. या सत्तासुंदरीपायी काँग्रेससह भल्याभल्या पक्षांचे पतन झालेले आपण पाहतोच आहोत. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील घोडचूक नेमकी कोणाची? ही खरोखर घोडचूक होती की कारस्थान? देशाच्या पंतप्रधानांचा जीव धोक्यात घालण्यापर्यंत टोकाची भूमिका घेणे योग्य आहे का, या सार्या प्रश्नांची उत्तरे चौकशीअंती बाहेर पडतीलच. तथापि या एकूण दुर्दैवी प्रकाराबाबत काँग्रेसने जे राजकारण सुरू केले आहे, ते संतापजनक आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत घडलेल्या घटनेबद्दल खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजी केली. मोदी आणि भारतीय जनता पक्षाची ही नौटंकी असल्याचे अत्यंत निषेधार्ह असे उद्गार त्यांनी काढले. आपण कुणाबाबत असली विधाने करीत आहोत याचेही भान त्यांना उरले नाही. पटोले यांच्यासारखे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले अनेक नेते त्यांच्या पक्षामध्ये आहेत. वास्तविक या संपूर्ण प्रकरणात पंजाबातील काँग्रेस सरकारची जबाबदारी अंतिम होती व उत्तरदायित्व त्यांच्याकडेच जाते. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील गफलतीबद्दल त्यांनी खरेतर संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. ते राहिले दूरच. उलटपक्षी गलिच्छ पातळीवरील राजकारण करण्यात मात्र विरोधी पक्षांचे नेते मश्गुल आहेत. काँग्रेससह महाविकास आघाडीचे महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे ते जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. इतके घाबरट आणि पळपुटे सरकार इतिहासात तरी पाहिले नाही अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केली. त्यात शतप्रतिशत तथ्य दिसते. फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराचे यथेच्छ वाभाडे काढले आणि त्यांच्या गेल्या दोन वर्षातील नाकर्तेपणाचा पाढाच वाचला. त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागा, असा ऑनलाइन सल्ला दिला. टीकेला उत्तर देण्यापेक्षा शिवसेनेला घराघरात पोचवा आणि आपल्या सरकारच्या कामांची माहिती करून द्या, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला असल्याचे समजते. कार्यकर्त्यांसाठी हे मोठे कठीण काम म्हटले पाहिजे! कारण गेल्या दोन वर्षांमध्ये ठाकरे सरकारने जनतेची नेमकी काय कामे केली हे सांगता येणे खरोखर अशक्य आहे. शेतकर्यांच्या कर्जमाफीपासून वादळग्रस्त व पूरग्रस्तांच्या मदतीपर्यंत आणि शिक्षणाला मुकलेल्या विद्यार्थीवर्गापासून उपाशीपोटी तडफडणार्या एसटी कामगारांपर्यंत सर्वांनाच महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा झटका बसला आहे. स्वतःच्या न केलेल्या कामाचा टेंभा मिरवणे अशक्य झाल्यानेच पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या प्रचंड नेतृत्वावर चिखलफेक करण्याचा खटाटोप महाविकास आघाडी सरकारचे नेते करताना दिसतात. त्यांच्या या मानसिकतेमध्येच त्यांच्या अपयशाची गुपिते दडलेली आहेत. खालच्या पातळीवरील राजकारण बंद करून आता तरी हे सरकार कामाला लागेल ही अपेक्षा ठेवण्यातही अर्थ उरलेला नाही.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …