पाली : प्रतिनिधी
पाली-खोपोली राज्य महामार्गावरील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या परळी (ता. सुधागड) गावात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथील पादचारी, प्रवासी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सुधागड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून परळी गाव व येथील बाजारपेठेची ओळख आहे. पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला परळी गाव व बाजारपेठ पसरली आहे. आजूबाजूच्या चाळीस-पंचेचाळीस गावांतील तसेच आदिवासी वाड्यांतील लोक या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. येथे दुतर्फा अस्ताव्यस्त उभी असलेली सहा आसनी वाहने व रिक्षा, दुचाकीमुळे इतर वाहनांना जाण्यास मार्ग मिळत नाही. नवीन वर्षात अनेकजण अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीला जात आहेत. तसेच मुंबई व पुणे आणि कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शिवाय अवजड वाहनांचीदेखील वर्दळ असते. परिणामी वाहतूक कोंडी अधिक बिकट होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनदेखील कोणीही ठाम भूमिका घेतांना दिसत नाही, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
परळी बाजारपेठ सदैव गजबजलेली असते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. ग्रामपंचायतीतर्फे याबाबत योग्य उपाययोजना करण्यात येईल.
-अॅड. प्रवीण कुंभार, ग्रामपंचायत सदस्य, परळी, ता. सुधागड