पंजाबवरील घटनेवरून देवेंद्र फडणवीस संतापले
मुंबई ः प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत ज्या रितीने विधाने करतायेत तो निर्लज्जतेचा कळस आहे. या नेत्यांमध्ये अपरिपक्वता दिसून येतो. 150 वर्ष जुन्या पक्षाच्या नेत्यांकडून अशी विधाने होतायेत, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये आंदोलनामुळे अडकून पडल्याच्या घटनेवरून फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 6) मुंबईत पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर तोफ डागली.
फडणवीस म्हणाले की, पंजाबमध्ये जी घटना घडली ती अतिशय गंभीर आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांत विविध पक्षांचे सरकार असते, पण देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी अशा प्रकारे खेळ यापूर्वी कधीही पाहिला नाही. पंजाबमधील घटना ही विचारपूर्वक केल्याचा कट दिसून येतो. पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा सुरक्षेबाबत काही नियमावली आहेत, त्या तंतोतंत पाळाव्या लागतात. सुरक्षेच्या नियमांची पुस्तिका असते. त्या पुस्तिकेप्रमाणे राज्यातील सुरक्षा दल, केंद्राचे सुरक्षा दल यांनी समन्वयाने काम करावे लागते. त्यामुळे याबाबत राज्याला माहिती नाही हे कसे होऊ शकते, असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा थांबवला जाईल आणि रास्ता ब्लॉक होईल असे जाणीवपूर्वक घडवण्यात आले. 15 ते 20 मिनिटे ताफा अडवण्यात आला. तिथून पाकिस्तानची बॉर्डर अतिशय जवळ आहे. पंतप्रधान मोदींचा जीव धोक्यात घालण्याचे काम पंजाबच्या सरकारने केले. या कठीण प्रसंगात मुख्यमंत्री फोनवर येण्यास तयार नाही. त्यामुळे हे सगळे पूर्वनियोजित होतं. या घटनेचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत जे काही घडले ते देशाने गंभीरतेने घेतले पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांवर हल्ला हा त्या व्यक्तीवर नसतो तर देशावर असतो. पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणार्या लोकांना कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मोदींच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. काँग्रेसचे नेते चोराच्या उलट्या बोंबा मारत आहेत. काँग्रेसचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेला धोका पोहचवण्याचशे षडयंत्र रचणारे आणि त्यांना समर्थन करणारे यांना देशातील जनता कधीच माफ करणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.