घोडे नियोजित ठिकाणी बांधण्याची मागणी
कर्जत : बातमीदार
काही वर्षांपूर्वी तेथील उजाड झालेले जंगल संयुक्त वनव्यवस्थापन समितीने वृक्षारोपण करून पुन्हा उभारले आहे आणि तेथे पुन्हा घोडे जाऊ नयेत यासाठी वनव्यवस्थापन समितीने बनवलेले लोखंडी रेलिंग अश्वपालांमुळे कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे ते सर्व घोडे त्यांना दिलेल्या ठिकाणीच बांधण्यात यावेत, अशी मागणी संयुक्त व्यवस्थापन समिती आणि नगरपालिकेकडे स्थानिकांनी केली आहे.
माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने माथेरानमध्ये पर्यटनासाठी घोड्यांवरून सैर करावी लागते. त्यासाठी माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथे घोडा स्टॅन्ड निश्चित करण्यात आला असतानादेखील अश्वपाल या रेलिंगला घोडे बांधून ठेवत आहेत.
पूर्वी दस्तुरी नाका येथील प्रवेशद्वाराजवळ हा घोडा स्टॅन्ड होता. त्या वेळी घोडे थेट तेथील जंगलात बांधले जायचे. परिणामी तेथील जंगल घोड्यांच्या मलमूत्रामुळे ओसाड, उजाड दिसू लागले होते. त्यामुळे त्या भागात माथेरान संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने झाडांची लागवड करण्यात आली. त्या ठिकाणी पुन्हा घोडे जाऊन झाडांचे नुकसान होऊ नये यासाठी सुरुवातीला लोखंडी तार बांधून संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर झाडे मोठी होऊ लागल्याने माथेरान संयुक्त व्यवस्थापन समितीने तेथे लोखंडी रेलिंगचे कुंपण घातले.
संयुक्त वनव्यवस्थापन समितीने बांधलेल्या त्या रेलिंगला घोडे बांधले जात असून एका वेळी असंख्य घोडे बांधले जात असल्याने ते घोडे लोखंडी रेलिंगला हलवत असतात. त्यामुळे रेलिंग खिळखिळ्या झाल्या असून घोडेवाल्यांच्या चुकीमुळे वनव्यवस्थापन समितीने जपलेले लोखंडी रेलिंग कधीही कोसळू शकते. त्यांना घोडे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असताना वनव्यवस्थापन समितीने उभारलेल्या रेलिंगलाच घोडे बांधण्याची चूक का करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घोडेवाले ऐकणार नसतील तर पालिकेने त्यांच्यावर कारवाई करावी.
आम्ही समितीच्या माध्यमातून लावलेली आणि नंतर या समितीने वाढवलेली झाडे यांच्या संरक्षणासाठी उभारलेली रेलिंग तुटली, तर घोडे आत जाणार आणि झाडाची मोडतोड होणार. आम्ही हे कदापि सहन करणार नाही.
-गिरीश पवार, माजी अध्यक्ष, व्यवस्थापन समिती
आम्ही त्या सर्व घोडेवाल्यांना सूचना केली आहे, पण आता पालिकेने त्यांच्यावर कारवाई करायला हवी. घोडेवाले हे एकमेकांचे नाव सांगून विषय टाळत आहेत. त्यामुळे आम्ही आता तेथे सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे बसविण्याच्या विचारात आहोत.
-योगेश जाधव, अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समितील
माथेरानचे प्रवेशद्वार सुंदर असावे यासाठी यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने झाडे वाढवली. त्यामुळे आता पालिकेने, तसेच वनविभागाने तेथे घोडे बांधले जाणार नाहीत याची खबरदारी घ्यायला हवी. त्यात जिवा महाले चौकात पार्किंगमधून येणारा रस्ता लिदने भरला आहे. त्याकडे पालिका लक्ष देणार आहे काय?
-प्रदीप घावरे, माजी नगरसेवक