भाजपचा जाहीरनामा सरसच
पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर नगरपंचायतीची दुसर्या टप्प्यातील निवडणूक 17 जानेवारीला होत असून त्यासाठी सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीसाठीचे जाहीरनामे याआधीच प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा सर्व जाहीरनाम्यांमध्ये सरस आहे. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा वचननामा आणि कार्यपूर्तीची यादी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून वचननामा असा उल्लेख करून आश्वासनांची यादी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वचकनामादेखील वाचनीय आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे अतिशय मुद्देसूद निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये विकास आराखडा शासनाकडून मंजूर करून घेणे, बाजिरे धरणातून पाणीपुरवठ्यासाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा, प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छतागृहांच्या इमारती, कचरामुक्त शहरासाठी अत्याधुनिक यंत्रणा, नवीन घरबांधणी आणि घरदुरुस्तीच्या परवानगीमध्ये पारदर्शकता आणून अनधिकृत बांधकामांवर आळा बसविणार, मोबाईल जनरेटरद्वारे पाणीपुरवठा, प्रत्येक प्रभागामध्ये गरजेप्रमाणे सौरऊर्जा दिवे आणि हायमास्ट दिवे, सावित्री व चोळई नदीत संरक्षक भिंती, सर्व घरधारकांना मिळकतपत्रे, तसेच जन्म-मृत्यू दाखले घरपोच, बेरोजगार युवकांसाठी रोजगार व वाहतुकीचे योग्य नियोजन अशा मुद्द्यांचा ऊहापोह करणार्या या जाहीरनाम्यामध्ये नगरपंचायतीची कक्षा वाढविण्याचा प्रयत्न हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा दिसून येत आहे. एकूण 12 जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत.
पोलादपूर नगरपंचायतीत शिवसेनेला पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमताची सत्ता प्राप्त झाल्याने जाहीरनाम्यामध्ये वचननामा आणि वचनपूर्तीची यादी नमूद करण्यात आली आहे. काही प्रभागातील मात्र न झालेल्या कार्यपूर्तीबाबत विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले असून प्रचारात या मुद्द्यांचा वापर प्रभावीपणे करण्यात आला. शिवसेनेकडून 17 प्रभागांपैकी 16 प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत.
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतर्फे वचननामा असा उल्लेख का करण्यात आला हे अनाकलनीय आहे. तरी सुसज्ज प्रशासकीय इमारत, शिवाजी नगर सैनिक नगर गावठाण प्लॉटचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याचा प्रयत्न, नागरिकांचा विमा, खुली व्यायामशाळा, अग्निशमनदल, नाटयगृह, सुलभ शौचालय, सांडपाणी व घनकचरा नियोजनाची चर्चा करण्यात आली आहे. आघाडीकडून सर्व 17 प्रभागांमध्ये उमेदवारी देण्यात आली असून आघाडीची उमेदवारसंख्या 18 आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या 4, तर काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या 14 आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा केवळ तीन जागांवर उमेदवार उभे करताना प्रभाग 17 मध्ये प्रतिष्ठेची लढत केल्याचे दिसून आले आहे.
भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसे यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक मुद्दे साम्यदर्शक असून शिवसेनेच्या जाहीरनाम्यात चुका दिसून येत आहेत.