कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा व मोकाट गुरांचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एका व्यक्तीवर कुत्र्यांनी हल्ला केला. तो हल्ला परतवताना तो रस्त्यावर पडला व त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी पनवेलला हलविण्यात आले आहे.
कर्जतच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कपड्याचे दुकान असलेले अभय बाफना (58) नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी घरून निघाले. शहरातील नगरपरिषद कार्यालयासमोर काही भटकी कुत्री फिरत होती. बाफना समोर आल्याबरोबर त्यातील काही कुत्री त्यांच्या अंगावर आली. त्यांच्या हल्ल्यापासून वाचण्याच्या गडबडीत ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि कानातून तसेच नाकातून रक्त येऊ लागले. त्याच वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या अन्य नागरिकांनी त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेले.
ही घटना त्यांच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी बाफना यांना पनवेल येथे उपचारासाठी हलविले. शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून दोनच दिवसांपूर्वी मुद्रे बुद्रुकमधील विजय बैलमारे यांनाही एक भटके कुत्रे कडकडून चावले होते. भटक्या कुत्र्यांचा व मोकाट गुरांचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यांचा बंदोबस्त नगरपरिषद प्रशासनाने करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पूर्वी ग्रामपंचायत व त्यानंतर नगरपरिषद झाली. तरीही मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाडा होता. आता तो अस्तित्वात नाही. शहरभर मोकाट गुरे फिरत असतात. त्यामुळे अपघात होतात. पूर्वी भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त व्हायचा. आता पुन्हा कुत्र्यांचा व गुरांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे, अन्यथा शाळा सुरू झाल्यावर लहान मुलांना कुत्र्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो.
-रणजित जैन, सदस्य, रायगड जिल्हा शांतता समिती