Breaking News

उन्हाळी पर्यटनासाठी माथेरान सज्ज

जगविख्यात पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख असल्यामुळे पर्यटक माथेरानला पहिली पसंती देत असतात. एप्रिल आणि मे महिना माथेरानमध्ये पर्यटन हंगामाचा महत्त्वाचा महिना असल्याने या महिन्यात पर्यटकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन हॉटेल व्यावसायिक उतरल्याने माथेरान पर्यटकांच्या सेवेसह सज्ज झाले आहे.शाळांना असलेल्या सुट्या आणि माथेरानमधील थंड हवामान लक्षात घेता आणि मुंबईपासून जवळ असल्याने पर्यटक माथेरानला पसंती देत असतात.

18व्या शतकात माथेरान हे थंड हवेचे ठिकाण ब्रिटिशांनी शोधून काढले. समुद्र किनारी किंवा डोंगरावर ब्रिटिशांची राहण्याची ठिकाणे असायची, त्याप्रमाणे माथेरान हे ठिकाण देखील असेच माथ्यावर शोधून काढले गेले. ब्रिटिशांनी माथेरानचा शोध लावल्यानंतर त्यांनी तेथे बारा बलुतेदार यांची वसाहत उभारली, मात्र ब्रिटिशांची उभ्या देशावर सत्ता असताना त्यांनी या लहानशा शहराला हिल स्टेशन नगरपालिकेचा दर्जा दिला. नंतर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीला आले असून आज जगातील वाहनांना बंदी असलेले हे एकमेव गाव म्हणून परिचित आहे. वाहनांना बंदी असल्याने वाहतूक अडथळे यांचा प्रश्न येत नसल्याने माथेरान हे निसर्गप्रेमी पर्यटकांना जवळचे वाटू लागले आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने पर्यटकांचा ओघ माथेरानकडे वाढत असतो. येथे एकूण तीन पर्यटन हंगाम असून यातील एप्रिल आणि मे महिना महत्त्वाचा असतो.त्याशिवाय पावसाळ्यात येथील धुक्यात हरवलेले माथेरान हे पर्यटकांना मागील काही वर्षे आणखी आकर्षित करीत असते, मात्र सर्वत्र कडक उष्मा असताना माथेरानमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आस्वाद घेण्यासाठी येत असतात. माथेरानच्या पर्यटन हंगामातील उन्हाळ्याचे दोन महिने हे पर्यटनासाठी उत्साही असेच असतात. त्यामुळे पर्यटन हंगामासाठी हॉटेल व्यवसायिक, तसेच अन्य व्यवसाय करणारे हे तयार होत आहेत. त्यांनी आपली दुकाने आणि हॉटेल्स, बाजारपेठ सजवल्या असून पर्यटनासाठी येणार्‍यांना नवीन काही तरी मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणात खरेदीच्या वस्तूंची आवक करून ठेवली आहे. हॉटेल व्यावसायिक, तसेच दुकानदार पर्यटकांच्या दिमातीसाठी सज्ज झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी पैशात जास्त सेवा हॉटेल व्यावसायिकांकडून दिल्या जाणार आहेत.

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी आलेले पर्यटक हे पहिली पसंती देतात ते नेरळ-माथेरान-नेरळ मिनिट्रेनला, मात्र मिनीट्रेनचा हा 21 किलोमीटरचा प्रवास करण्याची संधी नेरळ येथून मिळाली नाही, तर पर्यटकांसाठी अमन लॉज-माथेरान अशी मिनिट्रेनची शटल सेवा देखील सज्ज आहे. त्या शटल सेवेच्या सकाळी 8 पासून सायंकाळी 6 पर्यंत माथेरान-अमन लॉज-माथेरान अशा फेर्‍या सुरू असल्याने पर्यटकांना आपली हौस भागवता येते. त्यात आता रेल्वेने वातानुकूलित प्रवासी डबा उपलब्ध केल्याने मिनिट्रेनमधून प्रवास करण्याबद्दल कुतूहल वाढले आहे. त्यानंतर पर्यटकांचा लाडका घोडा आणि त्यावरून माथेरानमध्ये दूरवर पसरलेल्या भागात रपेट मारण्याची संधी देखील मिळत असल्याने साहसी पर्यटक माथेरानला पसंती देत असतात.  माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळे ही माथेरानला पर्यटकांना खेचून आणण्याची बलस्थाने आहेत. त्या ठिकाणी पर्यटक आवर्जून भेटी देत असतात, तर माथेरानमध्ये असलेल्या ओलांपिया रेसकोर्स मैदानावर मोठ्या प्रमाणात अश्व शर्यती होत असतात आणि तेथे घोड्याला हवे तसे पळवू शकत असल्याने पर्यटक खास घोड्याची रपेट मारण्यासाठी माथेरानला भेटी देत असतात. माथेरानमधील पाण्याचा तलाव आणि तेथे असलेले पुरातन शिवमंदिर यामुळे पर्यटक माथेरानला जागृत देवाच्या दर्शनासाठी भेटी देत असतात. माथेरानमधील कोल्हापुरी चप्पल आणि चामड्याच्या वस्तूंना विशेष मागणी असून त्या वस्तू खरेदी करण्यासाठी देखील पर्यटक माथेरानला पसंती देत असतात.

या वर्षी लोकसभेची निवडणूक एप्रिल महिन्यात असल्याने शाळांना लवकर सुटी पडणार आहे, तसेच निवडणूक दिवशी सर्व ऑफिस, कारखाने यांना सुटी असल्याने येथे पर्यटकांची मांदियाळी दिसणार. यामुळे सर्व माथेरानकरांची पर्यटकांच्या सेवेसाठी जय्यत तयारी सुरू असून वेगवेगळ्या सवलती देण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पर्यटकांचं पर्यटन कमी पैशात समाधानकारक होणार आहे.

पॅनोरमा पॉईंटवरून काय पाहाल?

1. या पॉईंटवरून सकाळी सूर्योदय पाहू शकता.

2. ऐतिहासिक पेब किल्ला दिसतो.

3. नागमोडी वळणे घेत घाटातून येणारी मिनिट्रेनचे विहंगम दृश्य दिसते.

4. हाजीमलंग डोंगर पाहू शकता.

5. धोदाणी धरणाचे मनमोहक दृश्य येथून दिसते.

6. पनवेल-तळोजा इंडस्ट्रीजचा भाग पाहू शकता.

पॉइंटचे वैशिष्ट्य-

1) माथेरानमधील सर्वात उंच ठिकाणावर असलेला पॉईंट

2) दोन्ही बाजूला दरी आणि मधून सुरक्षित रस्ता

3) ब्रिटिशांच्या काळातील बारमुख पार्क

4) बारमुख पार्कमधील विलोभनीय कारंजा

एको पॉईंट-

एको पॉईंट प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे, माथेरानमध्ये आलेला पर्यटक या पॉइंटला आवर्जून भेट देतात.

येथून काय पाहाल?

1)  या तलावाचा विस्तीर्ण जलाशय आणि येथील नयनरम्य परिसर.

2) माथेरानचे जागृत ग्रामदैवत श्रीपिसारनाथ मंदिर आणि येथील महादेवाची स्वयंभू पिंडी.

3) पश्चिम दिशेला दिसणारा प्रबळगडचा विस्तीर्ण पठार

4) उत्तर दिशेला लुईजा पॉइण्ट चा डोंगरकडा

5) येथून जवळच असलेले लॉर्ड पॉइण्ट आणि सिलिया पॉईंट येथून दिसणारे नयनरम्य देखावे. पूर्वी लॉर्ड पॉइंटच्या डोंगरकड्यालगत शारलोट लेक ते बेलवेडियर पॉइण्ट अशी पायवाट होती. त्या पायवाटेला डेंजर पाथ असे नाव होते.

शारलोट तलावाचे महत्त्व-

1) या 50 फूट उंच आणि अर्धा किलोमीटर पूर्व-पश्चिम विस्तार असलेल्या तलावाचा वापर मुखत्वे करून पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.

पावसाळ्यात हा जलाशय पूर्णपणे भरून वाहू लागला की त्या वेळी येथील वाहणारा पाण्याचा पांढराशुभ्र धबधबा मनमोहक दिसतो.

2) इतर ऋतूंमध्येसुद्धा शारलोट लेक येथील संध्याकाळ अल्हाददायक  वाटते. येथून पश्चिम दिशेला प्रबळगडाच्या डोंगराआड सूर्यास्तास जाणारा सूर्य देखील लाल-गुलाबी रंगाचा विविध छटांत आणि आकारांत मनमोहक दिसतो.

पार्क व्ह्यू पाईन पॉईंटचे महत्त्व-

1) हा माथेरानमधील महत्त्वाचा पॉईंट असून या पॉईंटवरून सूर्यास्त पाहता येते.

2) या पॉईंटचा आकार सायाळ या प्राण्याचा असल्याने या पॉइंटला पार्क व्ह्यू पाईन पॉईंट असे पडले आहे.

वन ट्री हिल पॉईंटचे वैशिष्ट्य-

1) डोंगरावर एकच झाड असल्याने या पॉईंट ला वन ट्री हिल असे नाव पडले आहे.

2) या पॉईंटवरून मोरबे धरण पूर्ण दिसते.

या वर्षी पर्यटकाना चांगली सुविधा मिळावी यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. या वर्षी प्रथमच एप्रिल महिन्यात अश्वशर्यतीचे आयोजन केले आहे. पर्यटकाना करमणुकीकरिता 20 दिवस उद्यानामध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा असणार आहे, तर मे महिन्यात माथेरान हेरिटेज महोत्सवाचे आयोजनदेखील करणार आहोत.

-प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा

आम्ही येथे येणार्‍या पर्यटकांना चांगली सुविधा देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. या वर्षी आम्ही हॉटेलमध्ये कोणतीही दरवाढ केली नाही. हॉटेलमधील खोल्या अद्ययावत केल्या असून पर्यटकांना मनोरंजनासाठी वेगवेगळे आऊट डोअर गेम्स, जगलर शो, मॅजिक शो, पपेट शोचे आयोजन असणार आहे. त्यामुळे या वर्षी पर्यटकांना कमी पैशात खूप मौजमजा करावयास मिळणार आहे.

-दिनेश वाधवानी, मालक हॉटेल कुमार प्लाझा

आमच्या हॉटेलमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती देणार आहोत. यामध्ये आमच्या हॉटेलला भेट देणार्‍या पर्यटकांना लकी पर्यटक म्हणून कुपन दिले जाणार आहे व त्यामधून लकी ड्रॉच्या माध्यमातून त्या पर्यटकाला गोव्याचे फ्री पॅकेज दिले जाणार आहे. हे कुपन आमच्या हॉटेलमध्ये राहणार्‍या पर्यटकाला मोफत देणार आहोत.

-प्रसाद सावंत, जनरल मॅनेजर, हॉटेल हॉर्सलँड

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply