पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात बहुतांश ठिकाणी कडधान्याची शेती केली जाते. या कडधान्य पिकाचे शेळी व गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेताला साड्यांचे कुंपण करत आहेत. पाली-खोपोली मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात साड्यांचे कुंपण लावलेली शेती आढळते.
पक्क्या भिंतीचे किंवा लोखंडी जाळी व तारांचे कुंपण करणे परवडत नसल्याने सर्वसाधारणपणे शेतकरी आपल्या शेताला करवंदाची जाळी, काटेरी पेरकूट, किंवा काट्याकुट्यांचे कुंपण करतात. मात्र रानमोडीने करवंदाच्या जाळ्यांचे नुकसान केले आहे. पेरकूट व काट्याकुट्यादेखील कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे शेताच्या कुंपणासाठी घरातील जुन्या साड्या वापरल्या जातात, असे एका शेतकर्याने सांगितले. जुन्या साड्यांचे कुंपण तयार करण्यास सोपे, कमी खर्चिक व कमी श्रमाचे असल्याने सुधागड तालुक्याती अनेक शेतकरी अशा कुंपणाला पसंती देत आहेत. त्यामुळे कडधान्य पिकांचे गुरे व शेळ्यांपासून संरक्षण होते, असे शेतकरी मनीष पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील गरीब व आदिवासी शेतकर्यांसाठी हे जुन्या साड्यांचे कुंपण वरदान ठरत आहे.