पनवेल ः प्रतिनिधी
केंद्र सरकारने नियमातील मर्यादा वाढवल्याने कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना डीआयसीजीसीच्या सुधारित नियमानुसार पाच लाखांपर्यंतच्या विम्याची रक्कम परत मिळणार असल्याने सोमवारी (दि. 30) बँकेच्या मुख्य शाखेत त्याबाबत अर्ज करण्यासाठी ठेवीदार आणि खातेदारांची मोठी रांग लागली होती. या वेळी अनेक ठेवीदार माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांना धन्यवाद देत होते, मात्र या वेळी बँकेकडून कोविड नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. दरम्यान, ठेवीदारांना रक्कम मिळण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल, असे प्रशासकीय अधिकारी म्हात्रे यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना बँकिंग बिझनेस इन इंडिया अंडर रेग्युरेशन 22 सेक्शन 56, रेग्युरेशन अॅक्ट 1949नुसार रद्द केल्यामुळे कर्नाळा बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी पाच लाखांपर्यंतच्या ठेवी (डीआयसीजीसी) रिझर्व्ह बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार ठेवीदारांना परत मिळणार आहेत. त्यासाठी कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केवायसी, ठेवी व खात्याची माहिती असलेला अर्ज भरून देण्याचे आवाहन बँकेचे तत्कालीन अवसायक जी. जी. मावळे यांनी केले होते. त्यामुळे सोमवारी पनवेलच्या मुख्य शाखेबाहेर लोकांनी मोठी रांग लावली होती. कर्नाळा बँकेची ही मुख्य शाखा उरण नाक्यावर गर्दीच्या ठिकाणी आहे. शाखेत जाण्यासाठी अरूंद जिन्यावरून जावे लागते. महाड सोडून सर्व शाखेतील खातेदारांनी मुख्य शाखेत अर्ज दाखल करायचे असल्याने तेथे मोठी रांग लागली होती. या ठिकाणी जागा अपुरी आहे. रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. पाऊस आल्यास भिजायला होऊ नये यासाठी प्रत्येक शाखेत अर्ज स्वीकारावे किंवा मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था करावी, अशी रांगेतील माणसांची मागणी आहे. ज्यांच्या नावाने ठेवी किवा खाते आहे त्या सर्वांचे केवायसीचे पेपर व दुसर्या बँकेचा कॅन्सल चेक या अर्जासोबत ठेवीदारांनी जोडायचे आहेत. बँकेत प्रत्येक काऊंटरवर कागदपत्र तपासून अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत आहे. अर्ज बँकेकडून डीआयसीजीसीकडे पाठवले जातील. तेथे त्याचे ऑडिट व क्रॉस व्हेरिफिकेशन करून क्लेम मंजूर होईल. त्यानंतर बँक खातेदाराला त्यांच्या ठेवीची ओरिजनल सर्टिफिकेटस् व बँक पास बुक घेऊन बँकेत बोलावले जाईल आणि त्यांच्या नावावर जमा असलेल्या रकमेपोटी पाच लाखांपर्यंतची रक्कम ठेवीदारांनी दिलेल्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल, असे प्रशासकीय अधिकारी म्हात्रे यांनी सांगितले.
कर्नाळा बँकेतील गर्दीबाबत प्रशासनाला विचारले असता, बँकेचे अनेक कर्मचारी नोकरी सोडून गेले आहेत. बँकेकडे उपलब्ध असलेले व प्रशासकांनी नेमलेले कर्मचारी यांची संख्या कमी आहे. त्यामुळे उपलब्ध अपुर्या कर्मचार्यांमार्फत काम चालवले जात आहे. प्रत्येक शाखेत अर्ज स्वीकारणे शक्य नाही. महाड हे लांब असल्याने तेथील ठेवीदारांसाठी महाडला सोय करण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले
-अशोक मुनोत, ठेवीदार
माझे पाच लाख रुपये ‘एफडी’मध्ये, तर दोन लाख खात्यात आहेत. दोन वर्षे फेर्या मारून एकही पैसा मिळाला नाही. या बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे गरिबांचे पैसे मिळत नव्हते, परंतु आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे गरिबांना पैसे मिळणार आहेत. त्यांनी चांगले काम केले आहे.
-नंदू अंबाजी पाटील, ठेवीदार
माझे तीन लाख रुपये कर्नाळा बँकेत आहेत. आम्हाला पैशाची खूप गरज होती, पण आजपर्यंत फुटकी कवडीही बँकेने दिली नाही. आता प्रशांत ठाकूर साहेबांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे आता आम्हाला पैसे मिळतील अशी आशा आहे. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.
-राजेंद्र उरणकर
माझ्या घरात कमवणारे कोणीही नाही. बँकेत माझे 15 हजार रुपये आहेत. मी पैसे मिळण्यासाठी बर्याच फेर्या मारल्या, पण मिळाले नाहीत. माझ्या अंगठ्याला लागले होते. सही करता येत नाही म्हणून डॉक्टरकडून सर्टिफिकेट आणा सांगितले. मग आमच्याकडे पैसे आले की, तुम्हाला फोन करू किवा तुम्ही फोन करून विचारा, असे यापूर्वी सांगत. आम्ही फोन केला की उचलायचे नाहीत. आता आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे पैसे मिळतील अशी आशा वाटते.
-वैशाली भगत, उलवा
अवसायक मावळेंची तडकाफडकी बदली
कर्नाळा बँकेचे अवसायक जी. जी. मावळे यांची महाविकास आघाडी सरकारच्या सहकार खात्याने तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागेवर पनवेलचे सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे यांची नियुक्ती केली आहे. मावळे यांनी 26 ऑगस्टला आपला पदभार सोडला आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सहकार खात्याने बँकेचे अनुभवी अवसायक जी. जी. मावळे यांची तडकाफडकी बदली कोणत्या कारणासाठी केली याची माहिती घ्यावी लागेल. यामागे राजकारण आहे का हेही पाहावे लागेल. कारण बँक अवसायनात निघाल्यावर शेकापने आपल्या नेत्यांची भली मोठी यादी व्हॉट्सअॅपवर टाकून त्यांच्याकडेच ठेवीदारांनी पैसे मिळण्यासाठी अर्ज करावे, असे म्हटले होते. त्याला मावळे यांनी विरोध केला होता. म्हणून राज्य सरकारकडून त्यांची बदली करून घेण्यात आली का याचा शोध घ्यायला हवा. ही माहिती घेऊनच त्यावर बोलणे योग्य होईल.