पनवेल : रामप्रहर वृत्त
पसिरातील खांदेश्वर शिवमंदिर येथील तलावाची उपमहापौर सीताताई सदानंद पाटील यांनी शनिवारी (दि. 15) पाहाणी केली.
खांदेश्वर तलाव परिसरात सुरक्षा भिंत असून या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. असे असतानाही काही बेशिस्त नागरिक तलावाच्या बाहेरच्या सुरक्षा भिंतीवरून व सुरक्षा रक्षकावर अरेरावी करत तलावात निर्माल्य टाकतात. त्यामुळे तलावाचे सौंदर्य व परिसर अस्वच्छ होत आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी तलावाच्या भोवतालच्या भिंतीवर तारेचे कुंपण बांधावे. जेणेकरून तलावात कोणीही निर्माल्य फेकणार नाही, अशी मागणी उपमहापौर सीताताई पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी सिडकोकडे वारंवार पाठपुरावा देखील केला आहे. शनिवारी खांदेश्वर शिवमंदिर तलाव परिसराची पाहणी करून उपमहापौर सीताताई पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच याबाबत सिडकोकडे पुन्हा एकदा पत्रव्यवहार करून तलाव परिसराच्या संरक्षण भिंतीवर तारेचे कुंपण बांधण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी सोबत भीमराव पवार, सदानंद पाटील, अभिषेक भोपी, दशरथ म्हात्रे, श्री. लोखंडे आदी उपस्थित होते.