रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात; प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर
साडेतीन मीटर खाली असलेल्या कळंबोली वसाहतीतील सिडकोनिर्मिती एलजी टाईपच्या घरामध्ये अक्षरशा मल मिश्रित पाणी शिरत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे त्याचबरोबर कित्तेक कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. यासंदर्भात स्त्री शक्ती फाउंडेशन ने आवाज उठवला आहे. संस्थेच्या संस्थापिका विजया कदम यांनी प्रशासनाकडे हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे.
या ठिकाणच्या मलनिस्सारण वाहिन्या जुनाट आणि जीर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी अनेक ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे चेंबरमधून सांडपाणी रस्त्यावर येत आहे. हा प्रश्न कळंबोलीतील तीनही एलआयसीमध्ये उद्भवलेला आहे. सांडपाण्याचं निस्सारण होत नसल्याने हे पाणी थेट एलआयजीच्या घरात घुसत आहे. हॉल, बेड आणि स्वयंपाक घरामध्ये पाणी साचत असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्याचबरोबर घरातील शौचालय मधून पाणी बाहेर येत आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होत असल्याने नाक दाबून संबंधितांना येथे राहावे लागत आहे.
स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका विजया कदम यांनी ही वस्तुस्थिती समोर आणली. त्यानंतर सिडको आणि महापालिका खडबडून जागे झाले. विशेष करून महापालिकेने सक्शन पंपाच्या माध्यमातून सर्व चेंबर साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच सिडकोने सुद्धा मलनिस्सारण केंद्रातील पंपिंग व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली आहेत. त्यामुळे परिस्थितीमध्ये बर्यापैकी सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.