‘राम प्रहर’च्या ‘खबरबात’ची दखल
पनवेल : प्रतिनिधी
कुली पनवेल स्टेशनवरून हद्पार झाला असून लवकरच मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरूनही हद्पार होण्याच्या मार्गावर आहे. या ‘राम प्रहर’मधील ‘खबरबात’ची दखल रेल्वेच्या प्रवाशी सुविधा समितीचे सदस्य अभिजित पाटील यांनी घेऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून या विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे.
’सारी दुनिया का बोझ हम उठाते है, लोग आते है लोग जाते है, हम यही पे खडे रह जाते है’ कुली चित्रपटात लाल डगला आणि हाताला बिल्ला लावून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कुलीच्या भूमिकेने रेल्वे स्टेशनवरील या कुलीला (स्टेशन सेवक) प्रतिष्ठा मिळवून दिली. पण आज रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधा आणि व्हीलवाल्या बॅगमुळे प्रवाशी स्वावलंबी झाले आहेत. त्यामुळे कुली पनवेल स्टेशनवरून हद्पार झाला असून लवकरच मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरूनही हद्पार होण्याच्या मार्गावर असल्याचे दैनिक राम प्रहरच्या खबरबात या सदरामध्ये 3 नोव्हेंबर रोजी लक्ष वेधण्यात आले होते.
पनवेल स्टेशनवर लिफ्टची सोय नाही, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, वृध्द, महिला आणि रुग्णांना सामान घेऊन जिने चढून जाताना त्रास होतो. त्यातच कुली नसल्याने प्रवाश्यांचे हाल होतात. पनवेल मध्ये 25-30 जण स्टेशनबाहेर कुलीचे काम करतात, पण ते प्रवाशांचे सामान घेऊन फलाटापर्यंत येऊ शकत नाहीत आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. या लोकांकडून वर्तणूकीचा पोलीस दाखला घेऊन त्यांच्याकडून फी घेऊन परवाना दिल्यास त्यांना ही रोजगार मिळेल. रेल्वेला ही महसूल मिळेल आणि प्रवाश्यांची सोय होईल, पण रेल्वेचे अधिकारी याला तयार नाहीत.
आज मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, दादर, ठाणे, कल्याण, बांद्रा आणि कुर्ला या महत्त्वाच्या स्टेशनवर कुलींची संख्या कमी आहे. जे आता आहेत ते पुढील दोन-तीन वर्षांत निवृत्त होतील पनवेल स्टेशनवर तर अधिकृत कुलीच नाही. त्यामुळे प्रवाशांना स्टेशनवर कुली उपलब्ध होत नसल्याने आपले सामान स्व:तच घेऊन जावे लागते. या वेळी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात.
या स्टेशनवरून रोज लाखो प्रवाशी येतात-जातात. त्यांना आपल्या बॅगावर पिशव्या त्यावर लहान मुले अशी कसरत करीत अरुंद आणि धोकादायक पूलावरून गाडी पकडायला जावे लागते. अशा वेळी एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याची दखल रेल्वेच्या प्रवाशी सुविधा समितीचे सदस्य अभिजित पाटील यांनी घेऊन 15 जानेवारी रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून या विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे.