केपटाऊन ः वृत्तसंस्था
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1ने गमावली आहे. यानंतर दुसर्याच दिवशी म्हणजे शनिवारी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. विराटने सोशल मीडियावर ही घोषणा केली, पण त्याने हा निर्णय पहिल्यांदा एका व्यक्तीला सांगितला आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) माहिती दिली हे देखील उघड झाले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी विराट कोहलीने सर्वप्रथम भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली होती. शुक्रवारी रात्रीच विराटने कसोटीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली होती. यानंतर त्याने बीसीसीआयला आपला निर्णय कळविला. प्रशिक्षक द्रविडला आपला निर्णय सांगितल्यानंतर विराटने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याशी कसोटी कर्णधारपद सोडण्याबाबत माहिती दिली होती आणि त्याचवेळी त्याचा राजीनामा स्वीकारण्यात आला. विराट कोहलीने 15 जानेवारी 2022 रोजी भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विशेष बाब म्हणजे पाच वर्षांपूर्वी 15 जानेवारीला विराटने भारतीय संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. गेले चार महिने विराटसाठी फारसा चांगला काळ गेला नाही. यादरम्यान त्याने चार संघांचे कर्णधारपद गमावले.
सर्व कर्णधारपदांतून मुक्त
विराट कोहलीने 16 सप्टेंबर 2021 रोजी विश्वचषकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 20 सप्टेंबर 2021 रोजी विराटने इंडियन प्रीमियर लीग 2021 व नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 8 डिसेंबर 2021 रोजी त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकले आणि संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले. आता 14 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने 15 जानेवारी 2022 रोजी ट्विटरवर कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.