पोलादपूर ः प्रतिनिधी
केंद्र सरकारने राज्याला जनतेच्या विकासासाठी विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून निधी देऊ केला आहे, मात्र राज्य सरकारने हा निधी वळता करून घेतलेला नाही. महाविकास आघाडी सरकारमधील मंडळींना राज्य चालवायचेच नाही. त्यामुळे केंद्र कोंडी करतेय असे भासवत केवळ राजकीय आकसाने अब्जावधीचा निधी पडून असल्याचा घणाघाती आरोप राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 16) येथे केला. पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसर्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संभाजी माने, रचना धुमाळ, प्रतिक सुर्वे आणि अंकिता जांभळेकर यांच्या प्रचारार्थ रॅली काढून झाल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांसोबत वार्तालाप केला. त्या वेळी ते बोलत होते. केंद्र सरकारचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते म्हणून मी कार्यरत असताना पोलादपूर नगरपंचायतीचा प्रत्येक भाजप उमेदवार म्हणजे मीच आहे, असे समजून पोलादपूरवासीयांनी आमच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामूणकर, गोरेगावचे भालचंद्र तथा नाना महाले, तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, राजन धुमाळ, जयवंत दळवी, एकनाथ कासुर्डे, शहराध्यक्ष राजाभाऊ दीक्षित यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते. पोलादपूर नगरपंचायतीच्या स्ट्रीट लाईटबाबत आक्रमक भाषा करणार्या काँग्रेस नगरसेवकांना शिवसेनेने कसे उचलून नगराध्यक्ष केले आणि आंदोलने व आक्रमक भाषा संपवली, याबाबत पोलादपूरकर जनता जाणून आहे, असे सांगून राज्याचे नगरविकासमंत्री शिवसेनेचे असताना कोणत्या नगराध्यक्षांनी मोठ्या निधीसाठी मंत्रालयामध्ये मागणी करून निधी आणल्याचे दाखवून द्या, असे आव्हान विरोधी पक्षनेते दरेकर यांनी दिले. नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून दिलेल्या भाजप नगरसेवकांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला नेऊन पोलादपूरमधील राष्ट्रीय महामार्गविषयक समस्यांची मांडणी करून घेणार असल्याचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ज्याप्रमाणे पोलादपूरच्या जनतेचा कौल दिसून आला तसाच दुसर्या टप्प्यामध्येही जनतेला मतदानाची इच्छा असल्याने भाजप उमेदवार निवडून येऊन सत्तेची संधी मिळणार हे उघड सत्य आहे. त्यामुळे नियोजनपूर्वक विकास करून घेण्यासाठी आपण पोलादपूरमध्ये तळ ठोकून बसणार असल्याचे दरेकर म्हणाले. पोलादपूर नगरपंचायतीच्या विस्तारीकरणाचा मुद्दा जाहीरनाम्यामध्ये मांडण्यामागे पोलादपूर शहराची वाढ सर्वच बाजूंनी खुंटली असल्याने अनेक विकासकामे पूर्णत्वास जाऊ शकत नसल्याचे दिसून आले आहे. पोलादपूरकर मतदारांनी शिवसेनेला सत्ता दिली. काँग्रेसलाही विरोधी पक्षाचे काम दिले. आता भाजपला निवडून सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहनही दरकेर यांनी केले.