Breaking News

विहूरमध्ये तिवराच्या झाडांची कत्तल, ग्रामस्थांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यांतील विहूर येथील सर्व्हे न. 20/1 (गट न. 111) लगतच्या जागेतील तिवराच्या झाडांची कत्तल करून समुद्रात भराव करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी विहुर ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तैझुन निसार हसोन्जी व त्यांच्या हस्तकांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप विहुर ग्रामस्थांनी मुरूड तहसीलदार रोशन शिंदे यांच्या मार्फत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.  विहूर किनारपट्टीवरील तिवर झाडांचे क्षेत्र  बंदिस्त केले जात आहे. मात्र येथील तिवराच्या झाडांची कत्तल करून तेथे मातीचा भराव टाकण्यात येत आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापासून समुद्री शेवाळ, सि-ग्रास या वनस्पती नष्ट करण्यात येत आहेत. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून या ठिकाणी मोठ-मोठे लोखंडी पोल उभे करण्यात आले आहेत. सी-ग्रास व तिवराची झाडे नष्ट केल्यामुळे माशांचे प्रजनन व अधिवास धोक्यात आले आहे. विहूर ग्रामपंचायतीने हे बेकायदेशीर अतिक्रमण थांबवण्यासाठी संबंधितास नोटीसा दिल्या. मात्र जिल्हा प्रशासन, एमटीडीसी, वन विभाग आणि मेरिटाईम बोर्ड या सर्वांनी आजपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी थेट संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करणे कायद्याला अपेक्षित होते परंतू उद्योजक तैजून यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महसूल सरकारी कार्यालयातील अधिकार्‍यां सोबत  मैत्रीचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे आज पर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही असे ग्रामस्थांचे मत आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करणार्‍या तैजून निसार हसोन्जी याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी विहुर ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. याबाबत विहूर ग्रामस्थांनी मुरुड तहसील कार्यालयाससुद्धा निवेदन दिले आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply