कोल्हापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कोल्हापूर ः प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर मंगळवारी (दि. 18) कोल्हापूर कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. या वेळी ‘एन. डी. पाटील अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
तत्पूर्वी एन. डी. पाटील यांचे पार्थिव रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेज प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी ‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि सामाजिक चळवळीतील नेते, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी रीघ लावली.
दुपारी एकच्या सुमारास एन. डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणण्यात आले. तेथे सर्व मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर मुलगा सुहास व प्रशांत यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला.
पुरोगामी चळवळीतील बिनीचे शिलेदार, विचारवंत, प्रभावी वक्ते आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणून पाटील यांची ओळख होती. या वेळी त्यांच्याविषयीच्या आठवणींनी सारेच गहिवरले.