Breaking News

माथेरानमध्ये घोड्यांचे रेबीज लसीकरण

कर्जत : बातमीदार

पशु संवर्धन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय व प्लांट अ‍ॅड. अ‍ॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरानमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात नुकतेच  घोडे आणि कुत्र्यांचे रेबीज लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरास अश्वचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जागतिक पशुकल्याण पंधरवड्यानिमित घेण्यात आलेल्या या शिबिरात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजित रानडे आणि पशुवैद्यकीय संवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. जी. एस. खांडेकर, डॉ. एस. एच. दळवी, डॉ. म. न. सावंत, डॉ. एस. टी. हांडे, डॉ. आर. आर. फरांदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्याम कदम, कळंब येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. वैशाली पाटील, माथेरानमधील पशुधन विकास अधिकारी अमोल कांबळे, पशुधन विस्तार अधिकारी मिलिंद जाधव प्लांट अ‍ॅड अ‍ॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे निलेश भणगे यांनी घोड्यांचे व श्वानांचे रेबीज लसीकरण करून घेतले. माथेरानचे पशुधन अधिकारी डॉ. अमोल कांबळे यांनी दोन्ही संस्थांचे स्वागत केले. 14 ते 29 जानेवारी हा जागतिक पशुकल्याण पंधरवडा असतो. माथेरानमध्ये पाळीव प्राण्याची संख्या जास्त असल्याने घोडे, श्वान यांच्यापासून रेबीज रोग पसरू शकतो. त्यासाठी सर्वांनी या शिबिरात घोडे आणि श्वान यांची तपासणी व लसीकरण करून घेतले, हे खूप महत्वाचे होते, असे प्रा. डॉ. जी. एस. खांडेकर यांनी सांगितले. रेबिज हा रोग घोड्याच्या लाळेवाटे माणसालाही  होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीने माथेरानमध्ये घोड्यांचे लसीकरण होणे महत्वाचे होते, असे प्रतिपादन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनीष सावंत यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी परिचारक राम तितकारे यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply