नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिनांवर स्तुतिसुमने उधळल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते माजीद मेनन यांनीही जिनांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
भारताच्या स्वातंत्र्यात आणि प्रगतीत काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरूंपासून मोहम्मद अली जिना यांचे योगदान असल्यामुळे मी काँग्रेस पक्षात आलो आहे, असे वादग्रस्त वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी केले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी टीका केली होती.
या विधानावरून वादळ उठताच, बोलताना माझी जीभ घसरली. मौलाना आझाद यांच्याऐवजी माझ्या तोंडून जिनांचे नाव निघाले, असे स्पष्टीकरण शत्रुघ्न यांनी दिले होते. तरीही माजीद मेनन यांनी सिन्हा यांची बाजू घेतल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.