भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 जानेवारी रोजी होणार्या ‘मन की बात निमित्त’ राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या 75 हजार बुथवर कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे संयोजक आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि. 28) दिली. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार लाड यांनी सांगितले की, मन की बात कार्यक्रम पक्षाच्या सर्व बूथवर ऐकला जावा असा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस व या कार्यक्रमाचे राज्य प्रभारी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. त्यासाठी राज्यस्तरीय संयोजन समिती स्थापन केली गेली आहे. या समितीचे प्रवीण घुगे सहसंयोजक असून समितीत आमदार संजय कुटे, राजेश बकाणे, इद्रिस मुलतानी, चैतन्य देशमुख, बबनराव चौधरी, बाळासाहेब सानप, प्रमोद जठार, संदीप लेले, अमित गोरखे, संजय उपाध्याय यांचा समावेश आहे.
मन की बात कार्यक्रम समाजातील शेतकरी, माजी सैनिक, वकील, डॉक्टर, ऊसतोड कामगार या वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते विशेष प्रयत्न करणार आहेत. या वेळी प्रत्येक बूथ समितीची बैठकही होणार असून या बैठकीत संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाईल, असेही आमदार लाड यांनी नमूद केले.