Breaking News

कर्जतमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आंदोलन

कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील मंदिर जमीन हस्तांतरण घोटाळा आणि अलिबागमधील वन जमिनीवरील बंगल्याप्रकरणी रायगड जिल्ह्याचे प्रशासन कोणत्याही प्रकारची मदत करीत नसल्याचा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, गेली सव्वा वर्षे पाठपुरावा करूनदेखील ठोस माहिती मिळत नसल्याने सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 28) कर्जत तहसील कार्यालयाबाहेर जमिनीवर बसून उपोषण करीत राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक शपथपत्रात कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील जमिनीचा दोनदा उल्लेख आला होता. या जमिनीची माहिती घेण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कर्जत येथे येऊन तहसीलदारांना संबंधित प्रकरणाची माहिती मिळावी यासाठी पत्र दिले होते. त्यानंतर संबंधित जमिनीबाबत नवनवीन माहिती सोमय्या यांच्यामुळे पुढे आली, मात्र दरम्यानच्या काळात या हिंदू देवस्थानची जमीन सलीम या मुस्लिम व्यक्तीच्या नावे कशी झाली याबद्दल जिल्हा प्रशासनाकडे खुलासा मागण्यात आला होता, मात्र सव्वा वर्षात त्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात सोमय्या हे थेट वैजनाथ येथे पोहचले आणि तेथील तलाठी कार्यालयात जाऊन त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर कर्जत तहसील कार्यलयात येऊन तहसीलदार विक्रम देशमुख यांना लेखी पत्र देत काही माहिती त्यांनी मागितली आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
भाजप नेते किरीट सोमय्या शुक्रवारी दुपारी कर्जत येथे आले आणि त्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन वैजनाथ येथील देवस्थान जमिनीबाबत माहिती मागितली. त्यानंतर तहसील कार्यालयातून बाहेर आलेल्या सोमय्या यांनी तेथील एका रिकाम्या शेडमध्ये जमिनीवर बसून आंदोलन सुरु केले. या वेळी सोमय्या यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश मुंढे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, भाजप तालुका सरचिटणीस संजय कराळे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, तालुका उपाध्यक्ष सचिन म्हसकर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, नगरसेविका स्वामिनी मांजरे, तसेच सरस्वती चौधरी, बिनिता घुमरे, गायत्री परांजपे, संदेश कराळे, मिनेश मसणे, केशव तरे, मयूर शितोळे, विजय कुलकर्णी, प्रभाकर पवार, अंकुश मुने, सर्वेश गोगटे आदी उपस्थित होते.
या वेळी सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकार आणि ठाकरे कुटुंबावर टीका केली. त्यांनी हिंदू देवस्थानची जमीन मुस्लिम व्यक्तीच्या नावावर झाली कशी, असा प्रश्न उपस्थित केला, तसेच तिच जमीन चार महिन्यांनी श्रीदत्त पाटणकर या व्यक्तीच्या नावावर झाली आहे, अशी माहिती देत हे पाटणकर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत, असेही सोमय्या यांनी सांगितले.
त्याचवेळी सोमय्या यांनी घोटाळे, व्यवहारप्रकरणी दाद मागूनही जिल्हा प्रशासन मागील सव्वा वर्षे केवळ टोलवाटोलवी करीत आहे, असा आरोप केला. कर्जत तहसील कार्यालयातून सोमय्या हे कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या डी-मार्ट येथे पोहचले आणि तेथील रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाच्या जमिनीची पाहणी केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply