ठाण्यात राष्ट्रवादीच्या बॅनरबाजीमुळे श्रेयवाद
ठाणे : प्रतिनिधी
ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज ठाणे महानगर पालिकेसमोर ’क्लस्टरचं.. पुन्हा गाजर.. आता तरी जागा हो ठाणेकर’ असा बॅनर लावल्याने ठाण्यात पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यातील कळवा खारेगाव येथील उड्डाण पुलाच्या श्रेयवादानंतर पुन्हा एकदा क्लस्टरच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद हा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
एकीकडे राज्यातील राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीत मांडीला मांडी लावून एकत्रित काम करताना दिसत असताना ठाण्यात मात्र या उलट चित्र पाहायला मिळाल आहे. गुरुवारी (दि. 27) ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारती आणि अनधिकृत इमारतींचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सिडको आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून क्लस्टर योजना राबवावी यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि सिडको अधिकारी यांच्या सोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत ठाणे महापालिका आणि सिडको अधिकार्यांना क्लस्टर बाबतच्या सूचनादेखील पालकमंत्री यांनी दिल्या. गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करत स्वाक्षर्या करण्यात आल्या त्यानंतर क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातून या क्लस्टर योजनेला सुरुवात होणार असून पुढे टप्प्याटप्याने संपूर्ण ठाण्यातील धोकादायक आणि अनधिकृत इमारती असलेल्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे. या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने क्लस्टरच.. पुन्हा गाजर.. अशी बॅनरबाजी करत टिकेचे शस्त्र सोडले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रम खामकर यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या समोर बॅनर लावून बॅनरमध्ये भल्यामोठ्या गाजराचा फोटो लावून क्लस्टरच.. पुन्हा गाजर.. आता तरी जागा हो ठाणेकर अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेनेवर केली आहे. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या वेळी सत्ताधारी क्लस्टरच्या नावाखाली गेल्या 10 वर्षांपासून मतदात्यांना मूर्ख बनवत असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी केली आहे.
ठाणे महापालिका विधानसभा लोकसभा निवडणुका जवळ आल्या की क्लस्टरच्या मुद्यावरून मताचा जोगवा मागत प्रत्येक निवडणुकीत मतदात्यांना क्लस्टरच गाजर दाखवलं जात असल्याचा आरोप खामकर यांनी या वेळी केला आहे. निवडणुका आल्या की क्लस्टरचे गाजर दाखवून फसवणूक केली जात असून एकप्रकारे ठाणेकरांची दिशाभूल करण्याचे काम सत्ताधारी आणि पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस विक्रम खामकर यांनी केला आहे, मात्र या बॅनरबाजीमुळे ठाण्यात महविकासआघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.