Friday , June 9 2023
Breaking News

अलिबागचा पांढरा कांदा अडचणीत; निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार

अलिबाग : प्रतिनिधी

भौगोलिक मानांकनामुळे खास ओळख मिळालेला अलिबागचा  पांढरा कांदा सध्या संकटात सापडला आहे. खराब हवामानाचा फटका या पिकाला बसतो आहे. अवकाळी पावसामुळे पिकाची दुबार लागवड करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली होती. आता मागील काही दिवसांपासून पडणारे धुके आणि करपा रोगामुळे यंदा कांद्याचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करताहेत. ऐन काढणीच्या हंगामातच पांढर्‍या कांद्याच्या पिकाला रोगाने ग्रासल्याने त्याची पाती पिवळी पडली आहे. शिवाय पुरेशी वाढ होत नसल्याने छोटा कांदा काढण्याची वेळ शेतक र्‍यांवर आली आहे. यामुळे इथला कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. चविष्ट आणि औषधी गुणधर्मामुळे अलिबागच्या पांढर्‍या कांद्याची वेगळी ओळख असून त्याला बाजारात मोठी मागणी आहे. तालुक्यात पांढर्‍या कांद्याचे 250 ते 300 हेक्टर पीक क्षेत्र आहे. गेल्या वर्षी 270 हेक्टरवर हे पीक घेण्यात आले होते. कार्ले, खंडाळे, वाडगाव, वेश्वी, झिराड अशा 10 ते 12 गावांमध्ये प्रामुख्याने पांढर्‍या कांद्याचे पीक घेतले जाते. यंदा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात दोन वेळा रोपे वर येण्याच्या हंगामातच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पुन्हा सातत्याने हवामानात बदल होत राहिले. कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ हवामान, मधेच पडणारे दाट धुके याचा एकत्रित परिणाम कांदा पिकावर झालेला दिसतो आहे. पिकावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याचेही दिसून येत आहे. मागील दोन वर्षे कोरोना व लॉकडाऊनमुळे मागणी असूनही शेतकरी पुरेसा कांदा बाजारात पाठवू शकले नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. पावसाळ्यातील भाताचे पीक घेतल्यानंतर हिवाळ्यातील कांदा पिकावर इथल्या अनेक कुटुंबांचा गाडा चालतो परंतु यंदा निसर्गाने साथ न दिल्यामुळे उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे.

बियाण्याची वानवा : यंदाच्या मोसमात दोन वेळा अवेळी पाऊस झाला. शेतात पाणी साचल्याने वर आलेली रोपे कुजून गेली. परिणामतः दुबार लागवड करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. यात बियाणे संपून गेले. पुढील वर्षीसाठी शेतकरी दरवर्षी बियाण्यांकरिता स्वतंत्र लागवड करतात परंतु मागील आठवड्यात वातावरणात झालेल्या बदलांमुळे बियाण्यासाठी केलेल्या लागवडीवरदेखील परिणाम झाला असून चांगल्या प्रतीचे बियाणे मिळण्याची शक्यता कमी आहे. यासाठी कृषी विभागाने काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

यंदा पांढर्‍या कांद्याचे पीक चांगले येईल अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. हवामानात सातत्याने होणारे बदल या पिकाला मारक ठरले. धुके आणि ढगाळ हवामानामुळे पिकांची योग्य वाढ झाली नाही. पाती पिवळी पडली. यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होताना दिसत आहे.

– सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply