पनवेल : वार्ताहर
तळोजा पोलीस व पनवेल तहसील कार्यालयाच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरात वापी येथून सीबीडी बेलापूर परिसरात जाणारा पेट्रोलजन्य ज्वलनशिल द्रव्य पदार्थ भरलेला टाटा कंपनीचा टँकर जप्त केला आहे. तळोजा हद्दीत एका रिकाम्या जागेत पार्किंग केलेला हा पेट्रोलजन्य ज्वलनशील द्रव्य भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टँकर चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात वापी येथून टाटा कंपनीचा टँकर (जी.जे 21 वाय 9171) या टँकरमध्ये पेट्रोलजन्य ज्वलनशील द्रव्य पदार्थ घेऊन सीबीडी बेलापूर परिसरात जायचे होते, मात्र हा टँकरचालक तळोजा हद्दीतील एका कंपनीजवळील मैदानावर वाहन उभे करून या ज्वलनशील द्रव्य पदार्थामध्ये भेसळ करीत होता. याच वेळी तळोजा पोलीस व पनवेल तहसील कार्यालयाच्या पथकाने टँकरचालक संसारीराम राजाराम यादव (रा. उत्तरप्रदेश) याला पथकाने ताब्यात घेतले. त्याचबरोबर तळोजा पोलीस ठाण्यात पेट्रोलियम अधिनियम 1934 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र हे ज्वलनशील द्रव्य हा बायोडिझेल आहे की आणखी काय याबाबत याचा नमुना मुंबई कालिना येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतरच हा कोणता द्रव्य आहे याची माहिती मिळणार आहे. याबाबत अधिक तपस तळोजा पोलीस करीत आहेत.