उरण : प्रतिनिधी
तालुक्याच्या पूर्व दिशेला डोंगर कुशीत वसलेल्या उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरण क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उरणवासीयांचे पुरते पाणीसंकट दूर झाले आहे. उरण तालुक्यातील उरण शहर आणि औद्योगिक क्षेत्रांना रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मे अखेर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात धरणाची पाण्याची पातळी अतिशय कमी होते. त्यामुळे उरण वासियांवर पाणी कपातीचे संकट निर्माण होत असते. या वर्षी निसर्गातील बदलामुळे पावसाने उशिरा हजेरी लावली, मात्र मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. धरण क्षेत्रात शनिवार (दि. 17)पर्यंत समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी 110 फुटापर्यंत वाढली आहे, तर 7.584 मिलियन कुबिक मीटर पाणी साठ्याची नोंद झाली असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रंजित बिरंजे यांनी दिली आहे. असाच धरण क्षेत्रात पाण्याचा जोर कायम राहिला तर लवकरच धरणाची शेवटची पाण्याची पातळी गाठून धरण ओसांडून पाहायला प्रारंभ होईल असेही बिरंजे यांनी स्पष्ट केले.