सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. या महाभयंकर विषाणूने विश्व व्यापले असून, अखिल मानवजातीवर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. अशा संकटकाळात काही व्यक्ती, संस्था पुढाकार घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. यामध्ये दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. जनतेच्या सुख-दु:खात धावून जाणारा हा लोकनेता कोरोनाच्या आपत्तीतही तन-मन-धन अर्पण करून कार्यरत आहे. शिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक, आरोग्यदायी उपक्रम राबवून महामारीतून सावरण्याचे बळ नागरिकांना दिले जात आहे.
लहानपणी अनुभवलेली प्रतिकूल परिस्थिती, सभोवताली पाहिलेले अन्यायग्रस्त समाजजीवन मग पुढे शिक्षणमहर्षि डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत स्वावलंबी शिक्षणासह जीवनमूल्यांची मिळालेली शिकवण अशी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जडणघडण झालेली आहे. त्यामुळे साहजिकच गरीब, गरजूंविषयी त्यांना कणव दिसून येते. ज्या समाजात राहून आपण मोठे झालो त्या समाजाप्रति बांधिलकी म्हणून आपल्या उत्पन्नातील एक हिस्सा ते वेळोवेळी खर्च करीत असतात. पैशाने अनेक जण श्रीमंत असतात, पण दानत मोजक्याच लोकांकडे असते. दान देण्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हात कुणीही धरू शकत नाही. त्यांच्याकडे आलेला याचक कधीही रिकाम्या हाती परतलेला नाही. त्याचबरोबर त्यांची मनाची श्रीमंतीदेखील अपार असल्याचे पनवेल, रायगडसह अवघ्या महाराष्ट्राने आजवर अनेकदा पाहिलेले आहे. म्हणूनच तर असंख्य लोक त्यांच्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जोडले गेले आणि याच जनताजनार्दनाने त्यांना लोकनेते ही पदवी बहाल केली.
जनतेवर कोणतेही संकट वा आपत्ती आली की लोकनेते रामशेठ ठाकूर मदतीसाठी सरसावतात. आताही कोरोनामुळे अनेकांची परवड सुरू असताना या संवेदशील लोकनेत्याने पुढाकार घेतला नसता तरच नवल. लॉकडाऊनमुळे गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्ष, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि टीआयपीएल कंपनीच्या माध्यमातून सर्वप्रथम जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप केले. त्याचप्रमाणे मोदी भोजन कम्युनिटी किचन नावाने अन्नछत्र सुरू करून भूकेल्यांना मायेचा घास दिला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते रोगप्रतिकारक गोळ्या, सॅनिटायझर व मास्कचे वाटप, रक्तदान शिबिर आदी उपक्रम राबवित आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आरोग्यदायी उपक्रम राबवून जनतेचे जीवन सुरक्षित करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गत पनवेल परिसरात 80 हजार मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकनेते रामशेठ ठाकूर इतरांसाठी जगत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात तर ते देवदूत ठरले आहेत. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
-समाधान पाटील, पनवेल
RamPrahar – The Panvel Daily Paper