Breaking News

हळदी-कुंकू समारंभात कोरोनाचे वाण

 पेणमधील प्रकार, आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पेण ः रामप्रहर वृत्त

कोरोना ससंर्गामुळे राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घातली आहेत. असे असतानाही पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भरविलेल्या हळदी-कुंकू समारंभात नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने झालेल्या या हळदी-कुंकू कार्यक्रमात चटई वाटप आणि होम मिनिस्टरसारखे स्पर्धात्मक कार्यक्रम असल्याने दीड ते दोन हजार महिलांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे शासनाच्या कोरोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन झाल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह वेदांती तटकरे, जिल्हा महिला अध्यक्ष गीता पालेरचा, लीना बाफना, नगरसेविका वसुधा पाटील, सरपंच रश्मी भगत, मंजुळा घासे, संतोष श्रुंगारपुरे, यशवंत घासे, नरेंद्र ठाकूर, दयानंद भगत, जितू ठाकूर, विशाल बाफना आदी पदाधिकारी उपस्थित होते. एकीकडे राज्य सरकार कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन करीत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी सरकारच्या आवाहनाला हरताळ फासून कोेरोना फैलावण्यास मदत करीत असल्याचे दिसून आले.

या हळदी-कुंकू कार्यक्रमात झालेली गर्दी पाहता पोलिसांनी आयोजकांना चटई वाटप बंद करण्याची सूचना दोन वेळा केली, मात्र पोलिसांच्या सूचनेकडे आयोजकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे कोरोना नियमांचे आणि पोलिसांच्या सूचनेचे उल्लंघन झाल्याने कार्यक्रम घेणार्‍या आयोजकांवर कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

महिलांची चेंगराचेंगरी

या वेळी महिलांना सौभाग्याचे वाण म्हणून चटईचे वाटप करण्यात येणार असल्याने महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, मात्र नियोजनाच्या अभावामुळे कार्यक्रमात अक्षरशः चेंगराचेंगरी झाली. त्याचबरोबर अनेक महिलांना चटईसाठी ताटकळत बसावे लागले, तर काहींना चटई न मिळाल्याने त्यांचा हिरमोड होऊन त्या अखेर कार्यक्रमातून निघून गेल्या.

निवडणुका आल्या की असे कार्यक्रम सुरू होतात, मात्र एवढी गर्दी करून कोरोनाला निमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही तर सामान्यांना एक न्याय आणि राजकीय कार्यक्रमाच्या आयोजकांना दुसरा असे म्हणावे लागेल.

-हरीश बेकावडे, सामाजिक कार्यकर्ते

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply