Breaking News

कर्जत विधानसभा मतदारसंघात विक्रमी मतदान

कर्जत : बातमीदार : कर्जत विधानसभा मतदारसंघात काल मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेले मतदान लक्षात घेता कर्जत विधानसभा मतदारसंघाची विक्रमी मतदानाकडे वाटचाल झाल्याचे दिसून  आले. साधारण 70 टक्के म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली असून याचा फायदा खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यापैकी कुणाला होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

कर्जत विधानसभा मतदारसंघात 2014च्या लोकसभा निवडणुकीत 56 टक्के मतदान झाले होते. यावर्षी कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. सकाळी मतदारांमध्ये उत्साह होता. त्यातच वातावरणात असलेल्या प्रचंड उष्म्यामुळे मतदारराजा दुपारी घरी बसला होता, मात्र कार्यकर्त्यांकडून मतदारांना बाहेर काढण्यात यश आल्याने दुपारी एकनंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. दुपारी तीनपर्यंत 48.01 टक्के मतदानाची नोंद झाली होती. उन्हाचा त्रास कमी झाल्याने दुपारी तीनपासून पाच वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानात सहभाग घेत 61.21 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतरदेखील मतदारांच्या रांगा वाढत राहिल्याने 70 टक्के मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे.त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाने कोणत्या पक्षाचे हित साधले जाणार याविषयी परिसरात अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

मतदानाला किरकोळ घटनांनी गालबोट लागले असून कर्जतचे आमदार सुरेश लाड, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबू घारे यांच्यासह अन्य आठ जणांवर मतदान केंद्राबाहेर मतदारांना आपल्या

उमेदवारांच्या चिठ्ठ्या दिल्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यात कर्जत दहिवली येथे दोन, लाडीवली, पोसरी आणि मार्केवाडी येथे एक अशा पाच तक्रारी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत, तर डिकसळ येथे रजत म्हसे या मतदाराने मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी असतानादेखील मोबाइल नेऊन आपला सेल्फी मतदान करीत असताना काढल्याबद्दल मतदान केंद्र अधिकार्‍यांनी या मतदाराविरुद्ध नेरळ पोलिसांत तक्रार दिली आहे. कर्जत पोलीस ठाण्यातील पाच तक्रारी या मतदान केंद्र परिसरात आपल्या उमेदवारांचा प्रचार केल्याबद्दल नोंद करण्यात आल्या आहेत.कर्जत पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुजाता तानवडे, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ जाधव आणि माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महादेव आचरेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. 1000हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात होते. त्यात राज्य राखीव पोलीस दल आणि सीआरपीएफ कमांडोंचा समावेश होता.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply