Breaking News

प्रो कबड्डी लीगमध्ये हरियाणाने जयपूरला नमविले

बंगळुरू ः वृत्तसंस्था

प्रो कबड्डी लीगमध्ये शनिवारी हरियाणा स्टीलर्सने जयपूर पिंक पँथर्सचा 35-28 असा पराभव करून आठव्या विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले. जयपूरलाही या सामन्यातून एक गुण मिळाला आणि ते सातव्या स्थानावर पोहचले आहेत. हरियाणाचा कर्णधार विकास कंडोलाने सुपर 10 कामगिरी केली. जयपूर पिंक पँथर्ससाठी अर्जुन देशवाल फ्लॉप ठरला आणि त्याला फक्त सहा रेड पॉइंट मिळू शकले. बचावफळीत, कर्णधार संदीप धुलने चमकदार कामगिरी करत हाय 5सह सहा टॅकल पॉइंट घेतले, मात्र तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. दीपक हुडाही दुसर्‍या हाफमध्ये फ्लॉप ठरला. या हंगामात जयपूर पिंक पँथर्सने आधी हरयाणा स्टीलर्सचा 40-38 असा पराभव केला, पण हरियाणा संघाने त्या पराभवाचा बदला घेतला. दुसर्‍या सामन्यात यूपी योद्धाने तेलुगू टायटन्सचा 39-35 असा पराभव केला. सलग चार सामने गमावल्यानंतर यूपीने पहिला सामना जिंकला. या सामन्यात सुरेंदर गिल आणि रजनीश यांनी सुपर 10 पूर्ण केले. बचावात कोणत्याही खेळाडूला हाय 5 घेता आला नाही. परदीप नरवाल फ्लॉप ठरला. त्याला केवळ तीन गुण मिळवता आले. त्याआधी पहिल्या सामन्यात यू मुंबाने तमिळ थलायवाजचा 35-33 असा पराभव करीत रोमांचक विजय नोंदवला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार फजल अत्राचलीने इतिहास रचला. त्याने प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात 350 टॅकल पॉइंट पूर्ण केले आणि असे करणारा तो मनजीत चिल्लरनंतरचा दुसरा खेळाडू ठरला. शिवाय असा पराक्रम करणारा तो पहिला विदेशी खेळाडू आहे. या सामन्यात अभिषेक सिंगने सर्वाधिक 10, व्ही अजित कुमार, अजिंक्य पवार आणि मनजीतने प्रत्येकी सात गुण मिळवले. सागरने बचावात चार गुण मिळवले, पण या सामन्यात एकाही खेळाडूला हाय 5 किंवा सुपर 10 मिळवता आला नाही.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply