कारवाईदरम्यान एकाचा मृत्यू
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीमधील चारफाटा नवीन शेवादरम्यान सिडकोच्या जागेवर बेकायदेशीरपणे वसविण्यात आलेल्या सुमारे 60 टपर्या, गाळ्यांवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने तोकड कारवाई केली. ह्या कारवाईदरम्यान एका ट्रकखाली आराम करीत असलेल्या एका व्यक्तीचा अपघात होऊन मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
उरण चारफाटा नवीन शेवा रस्त्याच्यादरम्यान दुतर्फाबाजुला सिडकोच्या जागेवर मटण शॉप, टायर, चायनीज स्टॉल आदी अनेक टपर्या, गाळे अनधिकृतपणे उभारण्यात आल्या आहेत. या बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या टपर्या गाळ्यांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. याविरोधात सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण कक्षाचे अधिकारी मोहसीन शेख यांच्या देखरेखीखाली तोडक कारवाई केली.
सिडकोच्या अतिक्रमणाची कारवाई सुरू होती. त्याचवेळी एक पार्किंग करून उभा असलेल्या खासगी ट्रक वाहनचालक मागे घेत होता, मात्र याच वेळी ट्रकखाली झोपलेला एक व्यक्ती टायरखाली येऊन चिरडला. यात त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या वेळी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा फौज फाटा तैनात केला होता.