Friday , June 9 2023
Breaking News

स्वरयुगाचा अस्त

नाम गुम जाएगा… चेहरा ये बदल जाएगा…मेरी आवाजही पहचान है… गर ना रहें… गुलजार लिखित या अजरामर ओळींमधून आपले आत्मसूत्रच जणू सांगणार्‍या भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी देह ठेवला. वार्धक्य कुणाला चुकले नाही, परंतु लतादीदींचा स्वर अमर आहे याची रसिकांना एवढी खात्री वाटत होती की लता मंगेशकर नावाचा देहसुद्धा त्या अलौकिक स्वरांसोबतच आपल्यामध्ये कायम राहील अशी काहीशी त्यांची भावना होती, पण कालगती कुणालाही चुकलेली नाही. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये आपण सार्‍यांनीच अनेक दिग्गज कलावंत गमावले आहेत. कोरोना काळामध्ये अनेकांना आपल्या आप्तांना अंतिम निरोप देण्याची वेदना सोसावी लागली आहे. असे असले तरी लतादीदींचे जाणे हे अवघ्या भारतीय समाजाला व्यथित करणारे आहे. वास्तविक वयपरत्वे लतादीदींनी काही वर्षांपूर्वीच गाणे थांबवले होते. त्यांचे गाणे जरी थांबले असले तरी त्यांचा सूर मात्र आपल्या सर्वांच्याच जीवनाभोवती रात्रंदिवस दरवळत होता. किंबहुना, पृथ्वीच्या कानाकोपर्‍यामध्ये असा एकही क्षण नसेल की जेव्हा लतादीदींच्या आवाजातील गाणे थांबले असेल. जगाच्या कोपर्‍यामध्ये कुठे ना कुठे लता मंगेशकर यांचे स्वर कुणा न कुणा रसिकाच्या आसपास रुंजी घालत राहिले आहेत व यापुढेही राहतील. टीव्ही असो की एफएम रेडिओ किंवा हातातला मोबाइल कुठल्या ना कुठल्या मनामध्ये लतादीदींचे सूर निनादत असतातच. हे भाग्य जगातील कुठल्याही गायकाच्या वा गायिकेच्या वाट्याला आलेले नाही. शनिवारी वसंत पंचमीच्या दिवशीच लतादीदींची प्रकृती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय झाला होता. वसंत ऋतुच्या आगमन काळीच या गानकोकिळेने या इहलोकीचा निरोप घ्यावा हा दैवयोग निश्चितच क्लेशकारक आहे. गेली सुमारे ऐंशी वर्षे सुरू असलेला हा स्वरांचा यज्ञ अखेर शांत झाला आहे. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांच्याबद्दलच्या आपल्या प्रेमआदरयुक्त भावना व्यक्त करण्यासाठी जगभरात अनेक शब्द खर्ची पडतील. त्यांची विशेष आवडणारी गाणी, त्या गाण्यांसोबत जोडलेल्या आठवणींची उजळणी सर्वसामान्य रसिक करतील तर संगीत क्षेत्राशी संबंधित कलाकार मंडळी साक्षात सरस्वतीसमान भासणार्‍या लतादीदींकडून कळत-नकळत आपण काय आणि किती शिकत गेलो याचे अनुभव समोर ठेवतील. लतादीदींचा स्वर अलौकिक होताच, पण त्या पलिकडच्या अनेकांना भावणार्‍या लतादीदी मिश्किल, मार्मिक टिप्पणी करणार्‍या होत्या. भारतीय सैन्यदलांतील जवानांविषयीची त्यांची आत्मियता सर्वज्ञात आहे. त्यांचे ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी… हे गाणे असंख्य वेळा ऐकलेले असूनही दर वेळेला तितक्याच तीव्रतेने कंठ दाटून येणे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले असेल. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने कुटुंबातीलच कुणी आदर्शवत वडीलधारी व्यक्ती गेल्याचे दु:ख व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया देश-विदेशातील भारतीयांकडून उमटताना दिसत आहेत, दिसत राहतील. अपुरेपणाची भावना तमाम भारतीय सिनेसंगीत रसिकांच्या मनात घर करून राहील, परंतु हे सारे तोकडे वाटावे असे हे दु:ख आहे. लतादीदी भारतरत्न होत्या. त्यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे, परंतु हे दु:ख दोन दिवसांत आटोपणारे नाही हे सार्‍यांनाच कळते. गेली सुमारे ऐंशी वर्षे लतादीदी नावाचा अलौकिक कंठ गाता राहिला. कोट्यवधी मने रिझवणार्‍या दीदींनी आपला स्वरच देशाला बहाल केला. नव्हे ती भारताची एक ओळखच बनली. त्या दृष्टीने पाहू गेल्यास लतादीदींच्या रूपाने आपण देशाचा सांस्कृतिक आणि कलात्मक आधारस्तंभच गमावला आहे असेच म्हणावे लागेल. लतादीदींनी आयुष्यभर पार्श्वगायन केले. विविध अभिनेत्रींना आपला आवाज उसना दिला, परंतु दीदींच्या स्वरामुळे चित्रपटगीत गाजले की त्या अभिनेत्रींच्या अभिनयामुळे, हा प्रश्न रसिकांनी स्वत:ला विचारावा. लता ही पार्श्वगायिका नसून त्यांचे गायिलेले चित्रपटगीत अभिनीत करणार्‍या अभिनेत्री याच पार्श्वनायिका आहेत असे वर्णन महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी एकदा केले होते. ते किती यथार्थ होते याची जाणीव आज अनेकांना होत असेल. लतादीदींचा हा दैवी स्वर अनंत काळ आपली सोबत करीत राहणारच आहे. परमेश्वर अनेक रूपांनी आपल्याला सामोरा येत राहतो असे म्हणतात. अलौकिक प्रतिभेचे कलाकार हे त्या सृष्टीनियंत्याचा साक्षात्कार आपल्याला घडवण्यासाठीच या भूतलावर येऊन जातात. लतादीदींचा दैवी स्वर हा असाच अनुभव देणारा. रहे ना रहे हम… मेहका करेंगे… या दीदींच्याच गाण्याच्या ओळी यापुढे भारतीय समाजाला दिलासा देत राहतील. कारण लता मंगेशकर नावाचा दैवी स्वरांचा सुगंध यापुढेदेखील दरवळत राहणार आहे हे खरे.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply