Breaking News

विश्वचषकविजेत्या संघासाठी लतादीदींनी गाणे गात जमा केले होते पैसे

मुंबई ः प्रतिनिधी

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) निधन झाले. त्यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम होते. सन 1983मध्ये भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्यात यश आले होते, त्या विश्वचषकाशी एक घटना लता मंगेशकर यांच्याशी संबंधित आहे. लता मंगेशकर यांनी लंडनहून आल्यानंतर दिल्लीतील इंद्रप्रस्थ स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होत 20 लाख रुपये जमा केले होते. ही चार तासांची मैफल होती. या वेळी लतादिदींचे भाऊ हृदयनाथ यांनी भारतीय संघासाठी खास एक गाणे तयार केले, जे सर्व सदस्यांनी गायले होते. मैफल संपल्यानंतर संघातील सदस्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. त्या काळी खेळाडूंना कमी पैसे मिळायचे. 2011मध्ये विश्वचषक जिंकणार्‍या संघातील सर्व सदस्यांना बीसीसीआयकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये मिळाले होते. लताजींनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्या घटनेची सविस्तर माहिती दिली होती. सामन्यापूर्वी तणावपूर्ण वातावरण होते. हळूहळू सामना पुढे सरकत होता आणि माझ्यात विजयाचा आत्मविश्वास वाढत होता, मात्र क्रिकेटमध्ये असे म्हटले जाते की, कधी काय होईल हे कळत नाही. कधीही सामना फिरू शकतो. सामन्यापूर्वी मी संपूर्ण संघाला भेटले. आपणच सामना जिंकू असे सर्व खेळाडूंनी सांगितले, असे लता मंगेशकर म्हणाल्या होत्या. विश्वचषकाच्या फायनलपूर्वी त्यांनी संघाला जेवणाचे निमंत्रण दिले होते. लताजींनी लॉर्ड्सवर भारत आणि वेस्ट इंडिजचा अंतिम सामनादेखील पाहिला होता. जिंकल्यानंतर त्यांनी भारतीय संघाला पुन्हा जेवणासाठी बोलावले.

निवृत्ती न घेण्याबाबत धोनीला केली होती विनंती

क्रिकेटप्रेमी असलेल्या लतादीदींचे मन माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने जिंकले होते. सन 2019मध्ये धोनी निवृत्ती घेणार अशा अफवा सुरू झाल्या होत्या. त्यावर लतादीदींनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करीत नमस्कार एमएस धोनी. तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असे माझ्या कानावर आले आहे. कृपया तुम्ही असा विचार करू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. निवृत्तीचा विचारही तुम्ही मनात आणू नका अशी माझी विनंती आहे, असे लता मंगेशकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply