रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील भातसई गावातील नळाला गेल्या आठवडाभरापासून पाणीच येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सरपंच गणेश खरीवले, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष मोरेश्वर खरीवले, ग्रामपंचायत सदस्य जयवंत खरीवले, समीर खरीवले यांनी एमआयडीसीच्या अभियंत्यांची भेट घेऊन भातसई गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी किनार्यावरील गावांना पुर्वी नैसर्गिक जलस्त्रोततून पाणीपुरवठा होत असे. मात्र धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांतील रासायनिक सांडपाण्यामुळे हे नैसर्गिक जलस्त्रोत दुषीत झाले. त्यामुळे या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला. या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसीच्या वतीने 26 गाव नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेतून सुरूवातीला तालुक्यातील पडम, खारापटी, निडी, कोपरा, भातसई, झोळांबे, लक्ष्मीनगर, शेणवई, डोंगरी, वावेखार, वावेपोटगे, यशवंतखार, सानेगाव, दापोली, करंजवीरा, कोपरी आदी गावांना सुरळीत पाणीपुरवठा केला जात होता. कालांतराने या योजनेचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे त्या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली. त्याबाबत तेथील ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर तहसील, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयात सदर पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने बैठका झाल्या. मात्र अद्यापपर्यंत 26 गाव नळपाणी योजनेतून सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. या योजनेतील गावांना अद्याप सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. तर काही गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. विशेषत: उन्हाळ्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. 26 गाव नळ पाणीपुरवठा योजनाचे पाणी काही लाभार्थी गावांपर्यंत पोहचत नसल्याने ही योजना कधी सुरळीत होणार, असे सवाल ग्रामस्थांतून विचारले जात आहेत.
रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजना सुस्थितीत करुन ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न राज्य शासनाने सोडवावा.
-गणेश खरीवले, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भातसई