Breaking News

नवीन प्रभाग रचना खालापूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलणार; जिल्हा परिषदेचा एक गट, तर पंचायत समितीचे दोन गण वाढणार

खोपोली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नवीन प्रभाग रचनेमुळे खालापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढणार असल्याने राजकीय समिकरणे बदलणार आहेत. खालापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे आठ गण आहेत. जि.प. एक गट वाढल्यास ती संख्या पाच होणार असून पं.स.चे दोन गण वाढल्यास दहा गण होणार आहेत. मात्र वाढीव गट आणि गणासाठी प्रभाग रचना बदलावी लागणार असल्याने त्याचा थेट परिणाम राजकीय मक्तेदारीवर होणार आहे. खालापूर तालुक्यात 2017 मध्ये झालेल्या जि.प., पं.स. निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीने सुरुंग लावला होता. या आघाडीने प्रथमच जि.प.च्या चार पैकी तीन गटात विजय मिळवला तर पंचायत समिती आठ पैकी पाच जागा जिंकत आघाडीने पंचवीस वर्षाची सेनेची मक्तेदारी मोडीत काढली होती. शिवसैनिकासाठी  हा मोठा धक्का होता. पाच वर्षापूर्वी शिवसेना तालुक्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढली होती. तर आघाडीमध्ये राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस हे पक्ष एकत्र होते. पाच वर्षात राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलाचा थेट परिणाम खालापूर तालुक्यात जाणवणार नसला तरी राष्ट्रवादी आणि शेकापमध्ये दुरावा आला आहे. महाविकास आघाडीत एकत्र असलेले शिवसेना, राष्ट्रवादी खालापूर तालुक्यात एकत्र येतील, याची सुतराम शक्यता नाही. जिल्हा परिषदेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने खालापूर तालुक्यातील वडगाव, साजगाव आणि वासांबे या तीन जागांवर विजय मिळाला होता. तर चौक गट  ठोंबरे बंधूच्या ताकदीने शिवसेनेच्या ताब्यात राहिला होता. जिल्हा परिषदेचा एक गट वाढताना चारही गटाची विभागणी होणार आहे. गट आणि गण मोडतोड करून एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गण वाढणार असल्याने  व्होट बँकेवर परिणाम होणार आहे. जिल्हा परिषदेला वडगाव, वासांबे, सातगाव आणि चौक गटाच्या जोडीला वावर्ले गट तयार होवू शकतो. तर पंचायत समितीच्या आठ गणात सावरोली आणि वाशिवली नवीन गण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. शिवसेना यावेळी शेकापला सोबत घेऊन लढण्याची दाट शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम आघाडीवर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी मिळवलेले यश टिकवून ठेवणे तर शिवसेनेला मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढताना नवीन गट आणि गण रचनादेखील महत्त्वाची ठरणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply