निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याने कारावास
अमरावती : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याने न्यायालयाने ही कारवाई केली.
अचलपूर मतदारसंघातून निवडून आलेल्या बच्चू कडू यांनी 2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतील स्वत:च्या मालकीच्या सुमारे 42 लाख 46 हजार रुपयांच्या फ्लॅटची माहिती लपविली होती. या गंभीर प्रकरणी चांदूरबाजारचे भाजप सरचिटणीस व नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017मध्ये आसेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 (अ) अंतर्गत गुन्हाही दाखल केला होता.
अखेर चार वर्षांनी या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला असून मंत्री बच्चू कडू यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा सिद्ध झाला आहे. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने या संदर्भात निर्णय देत कडू यांना दोन महिन्यांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
दरम्यान, दरम्यान मंत्री बच्चू कडू यांनी कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या ज्या घरावर आम्ही कर्ज घेतले होते त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. या प्रकरणात कोर्टाने आज जो काही निर्णय दिला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. आता आम्ही वरच्या न्यायालयात जाणार आहोत, असे कडू म्हणाले.