कर्जत नगर परिषदेने यंदा स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि माझी वसुंधरा अभियानासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात थ्री स्टार मानांकन मिळविणार्या कर्जत पालिका प्रशासनाने आता 2022च्या अभियानाची तयारी सुरू केली आहे.
सन 2019मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सुरुवात झाली. त्या वेळी पहिल्याच वर्षी कर्जत नगर परिषदेला दोन लाखांचे पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर सन 2021मध्ये कर्जत नगर परिषदेने राज्यातील लहान शहरांच्या नगर परिषदांमध्ये बाजी मारली आणि देशपातळीवर थ्री स्टार मानांकन मिळविले. त्याबद्दल पालिकेला नवी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021च्या पारितोषिक वितरण समारंभात सन्मानित करण्यात आले होते, तर राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानमध्ये राज्यस्तरावरील कामगिरी केली आहे. आता कर्जत नगर परिषद 2022च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि माझी वसुंधरा अभियानसाठी सज्ज झाली आहे. देशपातळीवर वरच्या क्रमांकात येण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या कर्जत पालिका प्रशासनाने या दोन्ही अभियानांसाठी गेल्या एप्रिल महिन्यापासून तयारी सुरू केली आहे.
अभियानाला सुरुवात होताच मोठ्या प्रमाणात जंगली पाच हजार झाडांची लागवड शहरातील मोकळ्या जागी करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवर आकर्षक दिसणारी झाडे लावली असून ही सर्व झाडे पालिकेने स्वतः नर्सरीमध्ये तयार केली आहेत. त्या झाडांची उंची साधारण सहा फूटपेक्षा अधिक असल्याने ही सर्व झाडे मोठ्या दिमाखात बहरली असून शहरातील मोकळ्या जागा या झाडांमुळे बहरल्या आहेत. त्याचवेळी आगामी पावसाळ्यात लावण्यासाठी तब्बल 25 हजार झाडांची तयारी रोपवाटिकेमध्ये सुरू आहे. त्यासाठी पालिकेने शहरालगत असलेल्या कल्पना नर्सरीमध्ये जंगली आणि औषधी झाडांची निर्मिती केली आहे.सध्या त्या नर्सरीमध्ये ही झाडे दोन-तीन फूट आकाराची तयार झाली असून पावसाळ्यात सहा फुटांहून अधिक आकाराची असणार आहेत. शहरात आणखी हरित पट्टे तयार करण्याचे उद्दिष्ट नगर परिषदेने ठेवले आहे. यापूर्वी कर्जत पालिका हद्दीत एकमेव हरितपट्टा होता. त्यात या वेळी आणखी एक हरित पट्टा विकसित केला जात असून मुद्रे येथे हा हरित पट्टा बनवला जात आहे.
माझी वसुंधरा अंतर्गत नर्सरीमध्ये झाडे फुलविण्याची कर्जत नगर परिषदेची पद्धती आर्थिकदृष्ट्यादेखील पैशाची बचत करणारी आहे, तर आगामी दोन महिन्यांत कर्जत शहरातील सर्व झाडांची गणना केली जाणार आहे. त्या झाडांची उंची, जाडी, झाडाचे नाव यांची माहिती संकलित करण्याचे काम पालिका हद्दीत सुरू झाले आहे.वसुंधरेचा समतोल राखण्यासाठी ही वृक्षगणना महत्त्वाची असून शहरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.
कर्जत शहरातील कचरा डेपो मागील काही वर्षे शून्य कचरा डेपो म्हणून ओळखला जात आहे. कचर्यावर प्रक्रिया करून त्याचे विघटन करण्यापूर्वी शहरातील कचरा ज्या सात वाहनांमधून गोळा केला जातो त्या घंटागाडी वाहनांना पालिकेने दररोजचे मार्ग ठरवून दिले आहेत. त्या गाड्या नागरिकांच्या दारात दररोज पोहचतात का? त्या वाहनांमध्ये कचरा संकलित होतो काय? याची माहिती घेण्याचाही प्रयत्न तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला जाणार आहे. शहरात कचरा साठू नये आणि एखाद्या ठिकाणी कचरा साठून राहिल्यास तो काही मिनिटांत उचलला जावा या हेतूने आता पालिकेने घंटागाड्यांना जीपीआरएस कार्यप्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीमुळे शहरात कचरा संकलित करणारी वाहने कोणत्या भागात आहेत हे आरोग्य विभागाला तत्काळ कळू शकणार आहे.
कर्जत पालिकेने कचर्यापासून पेव्हर ब्लॉक बनविले असून त्या पेव्हर ब्लॉकने बनविलेला रस्ता अधिक टिकाऊ असल्याचे सिद्ध झाले आहे तसेच कचरा डेपोमध्ये येणार्या प्लास्टिकचे विघटन करून पालिकेने गतिरोधक बनविले असून ते गतिरोधक राष्ट्रीय महामार्गावर प्रायोगिक तत्वावर परीक्षणासाठी लावले आहेत. त्या गतिरोधकांचे वयोमान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वापरत असलेल्या गतिरोधकांपेक्षा अधिक टिकाऊ असल्याचा दावा आहे. आता कर्जतच्या कचरा डेपोमध्ये गतिरोधक आणि पेव्हर ब्लॉक बनविण्याचे उद्दिष्ट वेगवेगळ्या ठिकाणी मागणी घेऊन मागणी तसा पुरवठा या तत्वावर ठेवण्यात येणार आहे.
शहरात जलसंवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून शहरातील जुन्या आणि पुरातन विहिरींचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. विहिरींची स्वच्छता करतानाच खोलीकरण आणि रंगरंगोटी तसेच माहितीपत्रक त्या ठिकाणी लावले जाणार आहे. हे नूतनीकरण मार्च महिन्यात पूर्ण केले जाणार असून सध्या त्या विहिरींमध्ये असलेल्या पाण्याचा वापर झाल्यावर ती कामे पूर्ण केली जाणार आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेने तयारी केली असून शहरातील गार्डनमध्ये पालिका असा प्रयोग करणार असून नंतर तो खासगी बांधकाम व्यवसायिक यांच्यासाठी लागू करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी जलसंवर्धन कार्यशाळा पालिकेने आयोजित केली होती.
कर्जत शहरात माझी वसुंधरा मित्र तयार करण्यात आले असून आजच्या घडीला पाच हजारहून अधिकांनी वसुंधरेचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे.
शहरातील विजेचे पथदिवे हे अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून आणि ग्रीन कर्जतच्या हेतूने एलईडी पध्दतीचे लावले गेले आहेत. शहरात आतापर्यंत पाच हजार एलईडी दिवे लागले असून 50 ठिकाणी सोलर पॅनल चौका-चौकात बसविले आहेत. त्यातून शहराचे रात्रीच्या प्रकाशात रुपडे पालटण्यास मदत झाली आहे. पालिकेने स्वतःपासून सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवून पालिकेच्या टेरेसवर 30 किलो वॅट वीज निर्मिती करणारे सोलर पॅनल बसविले आहेत. त्यातून संपूर्ण कार्यालयाची वीज बचत होऊ लागली आहे.
या वर्षीच्या राज्य सरकारच्या माझी वसुंधरा आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मोठी मजल मारण्यासाठी कर्जत नगर परिषद सज्ज झाली आहे. पालिकेने आगामी काळात सर्व सार्वजनिक ठिकाणी भिंतींचे स्वच्छता संदेशाने रंगविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याचवेळी सार्वजनिक शौचालय येथेदेखील स्वच्छता संदेश चित्रांमधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ग्रीन कर्जतसाठी सायकल ट्रॅक कर्जत शहरात बनविला जात असून शहरात आणि मुख्य रस्त्यांच्या बाजूला ते ट्रॅक असणार आहेत. अशी माहिती पालिका मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली. माझी वसुंधरा अंतर्गत आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा पालिकेने भरविल्या असून टाकाऊपासून टिकाऊ या स्पर्धेलादेखील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील जैव-विविधता जपण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम पालिकेने हाती घेतला असून कर्जत पालिका या अभियानाच्या माध्यमातून देशात आघाडीवर नेण्याचा सर्वांचा संकल्प आह.
वसुंधरा गार्डन..
पृथ्वी ज्यावर आधारित आहे त्या भूमी, जल, वायू, अग्नी यांची माहिती देणारे वसुंधरा गार्डन कर्जत शहरात उभे राहत आहेत. तेथे चित्रे आणि प्रतिमांच्या माध्यमातून नागरिकांना पृथ्वी म्हणजे वसुंधरेचा माहिती मिळू शकणार असून संबंधित वृक्षही माहिती मिळविण्याच्या उद्देशाने महत्त्वाचे ठरणार आहेत.
-संतोष पेरणे, खबरबात