खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत मंगळवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास सहा वाहनांच्या विचित्र अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
एक्स्प्रेस वेवर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ एका ट्रकचा (एमएच 12 एसएक्स 2127) टायर फुटल्याने मुंबईकडील लेनवर संथ गतीने वाहतूक सुरू होती. त्याचवेळी आणखी एका ट्रकचालकाचे वाहनावरील (एमएच 46 एआर 3877) नियंत्रण सुटून त्याने समोरील स्विफ्ट कार (एमएच 13 बीएन 7122) आणि टेम्पोला (एमएच 10 एडब्ल्यू 7611) पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे ही वाहने त्यापुढील कार (एमएच 21 बीक्यू 5281) आणि कंटेनरवर (एमएच 46 बीएम 5259) आदळली. या अपघातामध्ये स्विफ्ट कारमधील चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. गौरव खरात (36), गौरव तुळसे (32), सिद्धार्थ राजगुरू (31) आणि मयूर कदम (30, सर्व राहणार सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत
अपघातात दुसर्या कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, तर टेम्पोतील चार प्रवाशांना मुका मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच आयआरबी यंत्रणा, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त मदत टीमचे सर्व सदस्य, महामार्ग तसेच खोपोली पोलीस यांनी अपघातस्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …