Breaking News

तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे तसेच या सरकारमध्ये सगळे केवळ पैशांच्या पाठीमागे लागल्याचे सांगत सरकारचे मंत्री पैशांचा हव्यास करू लागले तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीसांनी म्हटले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते. राज्य गव्हर्नंसवर ठरते. आज महाराष्ट्रात गव्हर्नंस नावाची कोणतीही गोष्ट पाहायला मिळत नाही. अधिकार्‍यांच्या बदल्या, पोस्टिंग केवळ पैशांच्या आधारे होते आणि मेरिट डावलले जाते. तेव्हा तो अधिकारी पैसे कसे काढता येतील याचा विचार करतो. अशावेळी भ्रष्टाचाराची एक मालिका सुरू होते. यातून मग खूप मोठ्या प्रमाणात घोटाळे होतात.
मी पुराव्यांसह सभागृहात अनेक घोटाळे मांडले, पण सरकार त्यावर समर्पक उत्तर देऊ शकले नाही. आज एक एक विभागाचा घोटाळा पाहिला तर खूप मोठा आहे. सगळे केवळ पैशांच्या पाठीमागे लागले आहेत. सरकारचे मंत्री, लोकं इतका पैशांचा हव्यास करू लागले, तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले की, आज महाराष्ट्राची प्रतिमा संपूर्ण देशात बघा. एक तर पोलीस विभागातील बदली आणि पोस्टिंगचे घोटाळे झालेत. त्यामुळे आमची प्रतिमा खराब झालीय. आता जेव्हा बाहेरचा गुंतवणूकदार महाराष्ट्रात येतो तेव्हा तो घाबरतो. येथे गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात खंडणी द्यावी लागेल असे त्यांना वाटते.
सरकारच्या तिजोर्‍या लुटण्याचे काम सुरू आहे. एक एक टेंडर मॅनेज करण्यात येतेय. पदाचा दुरुपयोग पाहायला मिळत आहे. असे या आधीच्या कुठल्याही सरकारमध्ये मी पाहिलेले नाही, असेही फडणवीसांनी म्हटले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply