Breaking News

सार्वजनिक शौचालय : स्थानिकांची गैरसोय आणि राजकारण

नेरळ ग्रामपंचायतने गावातील वाल्मिकीनगर भागातील 20 वर्षांपूर्वी बांधलेले सार्वजनिक शौचालय तोडले आहे. त्यामुळे शौचालया अभावी परिसरातील रहिवाशांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल नेरळमध्ये चर्चा सुरु आहे. हे सार्वजनिक शौचालय तोडण्याच्या प्रकरणात पत्रकार अजय गायकवाड यांना मारहाण झाल्याने जिल्ह्यातील पत्रकारात संताप निर्माण झाला आहे.त्यानिमित्ताने हा लेख…

नेरळ गावातील आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या वाल्मिकीनगर भागात ग्रामपंचायतीने 20 वर्षांपूर्वी दोन सीटचे सार्वजनिक शौचालय बांधले होते. या भागात वस्ती वाढल्याने स्थानिक ग्रामस्थांची मागणी लक्षात  ग्रामपंचायतीने 10 वर्षांपूर्वी या ठिकाणी असलेले सार्वजनिक शौचालय चार सीटचे केले होते. या शौचालयामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून ते तोडण्यात यावे, अशी मागणी एका स्थानिक राहिवाशाने मागील महिन्यात ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यामुळे सदर सार्वजनिक शौचालय तोडण्यास हरकत असल्यास ग्रामपंचायत कार्यालयास कळवावे, असा फलक नेरळ ग्रामपंचायतीने त्या सार्वजनिक शौचालयावर लावून ठेवला. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीने ते सार्वजनिक शौचालय तोडून टाकले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली. उघड्या जागेत शौचास जाण्याची वेळ नेरळ ग्रामपंचायतीने वाल्मिकीनगरमधील कातकरी समाजाच्या लोकांवर आणली.

हागणदारी मुक्त अभियान राबविणार्‍या नेरळ ग्रामपंचायतीन जुने सार्वजनिक शौचालय तोडण्याआधी नवीन जागेत नवे सार्वजनिक शौचालय बांधून देण्याची आवश्यकता होती. सार्वजनिक शौचालय तोडून परिसरातील लोकांची गैरसोय करण्याचा अधिकार नेरळ ग्रामपंचायतीला दिला कोणी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे सार्वजनिक शौचालय तोडण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने जेसीबी मशीन आणले होते. त्याचा खर्च आणि आता नव्याने सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी येणारा खर्च जनतेच्या खिशातून होणार आहे. जुने सार्वजनिक शौचालय तोडून टाकावे म्हणून अर्ज करणार्‍या व्यक्तीकडून ग्रामपंचायत हा सर्व खर्च वसूल करणार आहे काय? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

आमच्या वाडीच्या समोरून कर्जत- कल्याण राज्यमार्ग जातो. या रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते. हातात डब्बा घेऊन रस्ता ओलांडताना लाजदेखील वाटते, असे रंजना वाघ सांगतात. तर शौचालय तुटल्याने आम्हला गावाबाहेर जावे लागत असून,खूप मोठी गैरसोय होत आहे अशी तक्रार गर्जना मुरकुटे यांनी केली.

सार्वजनिक शौचालय बांधून द्यावे…

सार्वजनिक शौचालय नसल्याने परिसरातील ग्रामस्थांची विशेषत: महिलांची कुचंबणा, गैरसोय होत आहे. शौचालय तोडण्याआधी ग्रामपंचायतीने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते.परंतु ना दुरुस्तीच्या नावाखाली ग्रामपंचायतीने हे शौचालय जमिनदोस्त केले. त्यामुळे येथे लवकरात लवकर शौचालय बांधून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ गुरुनाथ मिरकुटे यांनी केली आहे.

पुन्हा बांधून देणार…

या सार्वजनिक शौचालयाबाबत ग्रामपंचायत कार्यालयाला तेथील एका व्यक्तीचा तक्रारी अर्ज प्राप्त झालाय. शिवाय हे शौचालय नादुरुस्त झाले होते.तेेथे कधीही गंभीर दुर्घटना होऊ शकली असती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सुरुवातीला सूचना फलकदेखील लावले होते. शौचालया अभावी ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्याच ठिकाणी लवकरात लवकर पुन्हा सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार असल्याचे सरपंच उषा पारधी यांनी सांगितले.

नेरळ वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालय 9फेब्रुवारी रोजी तोडल्याने स्थानिक आदिवासी लोकांची गैरसोय होत होती. त्याबद्दल स्थानिकांनी  पत्रकार अजय गायकवाड यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन तसेच स्थानिक महिलांशी बोलून माहिती घेतली. त्यामुळे ते शौचालय तोडण्यासाठी अर्ज करणारे मॉन्टी कदम यांनी पत्रकार गायकवाड यांना 15 फेब्रुवारी रोजी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.त्यांना रस्त्यावर ढकलून देत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक विजय लगारे हे करीत आहेत, मात्र आरोपील अद्याप अटक झालेली नाही.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply